मिरजोळे येथे खाजगी बस घसरल्याने वाहतूक ठप्प; रत्नागिरी-करबुडे मार्गावर प्रवाशांचे हाल

Gramin Varta
478 Views

रत्नागिरी: रत्नागिरी-करबुडे मार्गावर मिरजोळे परिसरात आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास खाजगी बस घसरल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी बस रस्त्यात अडकल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित खाजगी बस रत्नागिरीहून गणपतीपुळ्याच्या दिशेने जात होती. मिरजोळे पाटवाडी नजीकच्या वळणावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने ही बस रस्त्यावरच घसरली. बस रस्त्याच्या मध्यभागी अडकल्यामुळे वाहतुकीचा मार्ग पूर्णपणे अवरोधित झाला आहे. या घटनेमुळे दोन्ही बाजूंच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून दुपारपर्यंत वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू होते. बस घसरल्यामुळे या परिसरात सकाळपासूनच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली असून, वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *