रास्त धान्य दुकानदारांचे सहा महिन्यांचे कमिशन प्रलंबित; रत्नागिरी जिल्हा रेशनिंग संघटनेचा संताप

Gramin Varta
282 Views

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील रास्त धान्य दुकानदारांना गेल्या सहा महिन्यांपासून त्यांचे हक्काचे कमिशन मिळालेले नाही. जानेवारी २०२६ ते जून २०२६ या कालावधीचे कमिशन अद्यापही दुकानदारांच्या खात्यात जमा न झाल्याने दुकानदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधत, रत्नागिरी जिल्हा रेशनिंग व केरोसीन चालक-मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोकराव कदम यांनी हे प्रलंबित कमिशन तातडीने अदा करण्याची मागणी प्रशासनाकडे लावून धरली आहे.

या संदर्भात दुकानदारांनी पुरवठा विभागाकडे विचारणा केली असता, जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीतील कमिशन दुकानदारांच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. तसेच, एप्रिल ते जून २०२६ या कालावधीसाठी आवश्यक असलेला निधी शासनाकडून प्राप्त झाला असून, पुढील १५ दिवसांच्या आत संबंधित रास्त धान्य दुकानदारांच्या खात्यात हे थकीत कमिशन जमा केले जाईल, असे आश्वासन उपजिल्हा पुरवठा अधिकारी वाघ यांनी दिले आहे.

मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून झालेल्या विलंबामुळे दुकानदारांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. रेशनिंगचे काम राबवताना होणारा खर्च आणि दुकानांचा व्यवस्थापन भार पाहता, हे कमिशन वेळेवर मिळणे गरजेचे असते. भविष्यात अशा प्रकारचा विलंब होऊ नये, अशी ठाम अपेक्षा जिल्ह्यातील रास्त धान्य दुकानदारांनी व्यक्त केली आहे. आता प्रशासनाच्या आश्वासनानुसार पुढील पंधरवड्यात हे कमिशन जमा होते की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *