चिपळूण: प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्दीच्या जोरावर चिपळूणच्या संस्कृती शीतल उदय ओतारी हिने मुंबईतील आशिया खंडातील पहिल्या व भारतातील अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘गव्हर्नमेंट लॉ कॉलेज’मधून कायद्याचे शिक्षण पूर्ण करत उच्चांकी यश संपादन केले आहे. अत्यंत कठीण प्रवेश प्रक्रिया असलेल्या या महाविद्यालयात मेरिटच्या आधारे प्रवेश मिळवल्यानंतर, संस्कृती हिने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर BLS LLB, सायबर लॉ आणि कोरियन भाषा यांसारख्या विविध परीक्षांमध्ये प्रथम श्रेणीत यश मिळवले आहे. केवळ कायद्याची पदवीच नव्हे, तर ऑल इंडिया बार कौन्सिलची सनद परीक्षा आणि लॉ LLM ची सीईटी परीक्षा देखील तिने यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक यांसारख्या अनेक दिग्गज राष्ट्रपुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि देशातील अनेक सरन्यायाधीश व कायदेतज्ज्ञांना घडवणाऱ्या या संस्थेतून संस्कृतीची ही घोडदौड तिच्या संघर्षाची गाथा सांगणारी आहे. मुंबईसारख्या महागाईच्या शहरात राहून, कोणताही हट्ट न करता अत्यंत संयमाने तिने आपले शिक्षण पूर्ण केले. या प्रवासात आदरणीय आमदार शेखर निकम आणि पालकमंत्री उदय सामंत यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे सांगत, संस्कृतीच्या पालकांनी तिचे कौतुक केले आहे. या यशामुळे चिपळूणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, भविष्यात एक निष्णात कायदेतज्ज्ञ म्हणून ती आपल्या शहराचे नाव उज्ज्वल करेल, अशी भावना व्यक्त होत आहे.
