वाकेड दरड दुर्घटनेतील मदतकर्त्यांचा लांजा पोलिसांकडून गौरव

Gramin Varta
359 Views

पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान

लांजा/फरहान पाटणकर: मुंबई-गोवा महामार्गावरील वाकेड येथील लक्ष्मीबाग परिसरातील इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर झालेल्या दरड दुर्घटनेदरम्यान प्रशासनाला मदत करणाऱ्या विविध क्षेत्रांतील व्यक्तींचा लांजा पोलीस ठाण्याच्या वतीने मंगळवारी ७ जुलै रोजी सन्मान करण्यात आला. लांजा शहरातील संकल्प सिद्धी सभागृहात झालेल्या कार्यक्रमात पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन या सर्वांचा गौरव करण्यात आला.

मुंबई-गोवा महामार्गावरील वाकेड येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंपाच्या केबिनवर शनिवारी ४ जुलै रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास दरड कोसळून दुर्दैवी दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत ५० ते ५५ वर्षीय अनोळखी वेडसर व्यक्ती मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकून मृत्युमुखी पडली होती. मुसळधार पाऊस, मोठ्या प्रमाणातील मातीचा ढिगारा आणि प्रतिकूल परिस्थिती अशा आव्हानांवर मात करत पोलीस, महसूल प्रशासन तसेच स्वयंसेवकांनी सुमारे साडेसात तास अथक मदतकार्य केले. चार जेसीबींच्या साहाय्याने पहाटे साडेचारच्या सुमारास मृतदेह बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले होते.

या कठीण मदतकार्यात मोलाची साथ देणाऱ्या वाकेडचे सरपंच संदीप महादेव सावंत, पोलीस पाटील जयवंत भिकाजी जाधव, जिजाऊ शिक्षण व सामाजिक संस्थेचे लांजा तालुकाध्यक्ष योगेश संतोष पांचाळ, संस्थेचे रुग्णवाहिका चालक संदेश टोलू पडद, ईगल इन्फ्रा इंडिया लिमिटेडचे जेसीबी ऑपरेटर विकास राठोड व सचिन जाधव, पोकलॅन ऑपरेटर अमित खुशवा, लोडर ऑपरेटर राजू यादव, टिपर चालक सोनू महापौर तसेच लांजातील जेसीबी ऑपरेटर सलीम मेहबूब सुंबड, रियाज मेहबूब सुंबड आणि आसिम अमीन मुल्ला यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी या सर्वांच्या धाडसी व निस्वार्थ सेवाभावाचे कौतुक करत, संकटाच्या काळात प्रशासनाला दिलेल्या सहकार्यामुळे मदतकार्य अधिक वेगाने आणि प्रभावीपणे पार पडल्याचे सांगितले. तसेच भविष्यातही अशाच सामाजिक बांधिलकीने कार्य करण्यासाठी शुभेच्छा व्यक्त करत सर्वांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *