लांजा/फरहान पाटणकर : तालुक्यातील आरगाव बौद्धवाडी येथे चिऱ्याचा बांध बांधण्याचे काम सुरू असताना अचानक बांध कोसळून त्याखाली दबलेल्या मजूर महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी २२ जून रोजी सायंकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्पना कमलाकर यद्रे (वय ३९, रा.आरगाव कुणनेगाव, ता.लांजा) या आरगाव बौद्धवाडी येथील मुकुंद कदम यांच्याकडे सुरू असलेल्या चिऱ्याच्या बांधकामाच्या ठिकाणी मजुरीचे काम करत होत्या. त्या बांधाजवळ मातीचा भराव टाकण्याचे काम करीत असताना सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली.
अचानक झालेल्या पावसामुळे चिऱ्याचा बांध कोसळला आणि त्याखाली कल्पना यद्रे दबल्या गेल्या. या दुर्घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या. घटनास्थळी उपस्थित असलेल्यांनी तत्काळ मदतकार्य करून त्यांना बाहेर काढले व पुढील उपचारासाठी लांजा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात रात्री ७.४५ वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल विलास जाधव अधिक तपास करीत आहेत.
दरम्यान, या अचानक घडलेल्या दुर्घटनेमुळे आरगावातील यद्रे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे.
बांध घालताना अंगावर कोसळून महिलेचा मृत्यू
Leave a Comment
