रायगड : जिल्ह्यातील पेण तालुक्यातील पाटणेश्वर आदिवासी वाडी येथे पाच वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रिया सागर वाघमारे (वय ५) असे मृत चिमुकलीचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
रिया रात्री आपल्या आई-वडिलांसोबत घरी झोपली असताना पहाटे तीनच्या सुमारास ती बेपत्ता झाल्याचे तिच्या वडिलांच्या लक्षात आले. कुटुंबीयांनी परिसरात शोध घेऊनही मुलगी न सापडल्याने त्यांनी पेण पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली आणि डॉग स्कॉडच्या मदतीने सकाळी आठच्या सुमारास घरापासून सुमारे १०० मीटर अंतरावरील शेतात रियाचा मृतदेह आढळून आला.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आणि तपासाची सूत्रे हाती घेतली. तपासादरम्यान पोलिसांनी किरण भिकू वाघमारे (वय २४) याला ताब्यात घेतले असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याच्याविरुद्ध संबंधित कायदेशीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, रियाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पेण उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असून, या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
