डोंबिवली : आयुष्याच्या उत्तरार्धात कोणाची तरी साथ मिळावी या आशेने मॅट्रिमोनिअल साईटवर जोडीदार शोधणाऱ्या ७३ वर्षीय आजींचा विश्वास एका भामट्याने अक्षरशः पायदळी तुडवला आहे. प्रेमाचे आणि सोबतीचे गोड स्वप्न दाखवून अनुज संतोष तिवारी या आरोपीने या वृद्ध महिलेची ५७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या भीषण फसवणुकीमुळे आपली संपूर्ण जमापुंजी गमावलेल्या आजींवर आता वृद्धाश्रमाचा आश्रय घेण्याची दुर्दैवी वेळ ओढवली आहे.
डोंबिवलीत राहणाऱ्या या ७३ वर्षीय आजींनी एकाकीपण घालवण्यासाठी मॅट्रिमोनिअल साईटवर नोंदणी केली होती. तिथे त्यांची ओळख अनुज तिवारी उर्फ अनुज त्रिवेदी याच्याशी झाली. त्याने सुरुवातीला अत्यंत गोड बोलून आणि घरगुती तसेच वैद्यकीय कारणांचे सोंग रचून आजींचा विश्वास संपादन केला. एकत्र राहण्याचे आमिष दाखवून त्याने हळूहळू टप्प्याटप्प्याने आजींच्या खात्यातून ५७ लाख रुपये उकळले. पैसे हाती पडताच आरोपीने आजींशी संपर्क तोडून त्यांना वाऱ्यावर सोडले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच आजींनी पोलिसांत धाव घेतली.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे आरोपीचे लोकेशन शोधून काढले. आरोपीचे लोकेशन दिल्लीत असल्याचे निष्पन्न होताच पोलिसांच्या पथकाने तिथे धडक देऊन अनुज तिवारीला बेड्या ठोकल्या. चौकशीदरम्यान, मूळचा लखनऊचा असलेला हा आरोपी एकट्या महिलांना मॅट्रिमोनिअल साईटद्वारे हेरून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यात माहीर असल्याचे समोर आले आहे. तो अशा प्रकारे अनेक महिलांची फसवणूक करत असल्याचे तपासात उघड होत आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी ऑनलाइन ओळख करताना अत्यंत सतर्क राहण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. सध्या पोलीस आरोपीकडून अधिक माहिती घेत असून, त्याने आणखी किती महिलांची फसवणूक केली आहे, याचा शोध घेतला जात आहे.
