पुणे : वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत (NTA) घेण्यात आलेल्या नीट-यूजी (NEET-UG) फेरपरीक्षेत पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील खडकी गावच्या श्रावणी कृष्णा कुदळे या विद्यार्थिनीने उत्तुंग यश संपादन केले आहे. श्रावणीने ७२० पैकी ७१० गुण मिळवत देशात पाचवा, तर मुलींमध्ये देशात आणि संपूर्ण महाराष्ट्रात पहिला क्रमांक पटकावला आहे. पेपरफुटीच्या संकटामुळे परीक्षा रद्द झाल्यानंतर खचून न जाता, मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा योग्य वापर करत तिने हे यश मिळवले असून, तिच्या या कामगिरीमुळे संपूर्ण जिल्ह्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
एनटीएतर्फे मे महिन्यात घेण्यात आलेली नीट परीक्षा पेपरफुटीच्या प्रकारामुळे रद्द करण्यात आली होती. त्यानंतर २१ जून रोजी पुन्हा परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, त्यात श्रावणीने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. श्रावणीचे वडील कृष्णा कुदळे आणि आई जयश्री कुदळे हे दोघेही जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. तिचे प्राथमिक शिक्षण दौंड तालुक्यातील गोपाळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत, माध्यमिक शिक्षण माळेगाव येथील शारदाबाई पवार विद्यानिकेतनमध्ये आणि अकरावी-बारावीचे शिक्षण लडकत स्कूलमध्ये झाले आहे. अभ्यासात सातत्य आणि संकल्पना स्पष्ट करण्यावर भर दिल्याने हे यश मिळाल्याचे श्रावणीने सांगितले. पेपरफुटीच्या घटनेकडे नकारात्मक न पाहता, ती एक संधी म्हणून स्वीकारली आणि अधिक नेटाने अभ्यास केल्याचे तिने नमूद केले.
यंदाच्या परीक्षेत देशभरातील सुमारे २० लाख विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता, त्यापैकी ११.२१ लाख विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. श्रावणीसह राज्यातील मोहनसिंह भोसले (१० वा), सार्थक पाटील (१४ वा), सान्निध्य डोंगरे (२८ वा), अर्णव लाहोटी (३२ वा), प्रणव टेंभुर्णे (३३ वा), रौश्मित गुप्ता (३४ वा), सोहम पाटील (५३ वा), सागर कारीकर (६७ वा), सौम्या बडोले (७७ वा), अनुश्री थोरात (८५ वा), आर्या दिवेकर (९० वा), सहीम पटवेगार (१०६ वा), सुहान शेख (११६ वा), अमीर वारावाला (११९ वा), सार्थक पेठकर (१२० वा), श्रीवल्लभ गावडे (१२२ वा) आणि गोपाळ पाटील (१३७ वा) या गुणवंत विद्यार्थ्यांनीही चमकदार कामगिरी करत राज्याचा नावलौकिक वाढवला आहे. छोट्या गावातील विद्यार्थ्यांनी योग्य मार्गदर्शन आणि मेहनतीच्या जोरावर राष्ट्रीय पातळीवर यश मिळवून दिले असल्याने ग्रामीण भागातील गुणवत्तेचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे.
