मुंबई : राज्यातील मतदार यादी पडताळणी प्रक्रियेबाबत (SIR) मुख्य निवडणूक आयोगाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, या मोहिमेला १० दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. या निर्णयामुळे आता घरोघरी जाऊन केली जाणारी मतदार यादी पडताळणी मोहीम ८ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे प्रशासनासह नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अचूक मतदार यादी तयार करण्यासाठी ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबवण्यास मदत होणार आहे.
निवडणूक आयोगाच्या सुधारित वेळापत्रकानुसार, बूथ लेव्हल अधिकाऱ्यांमार्फत (BLO) राबवण्यात येणारी ही पडताळणी मोहीम यापूर्वी २९ जुलै रोजी पूर्ण करण्याचे नियोजन होते. मात्र, प्रक्रियेला अधिक वेळ मिळावा आणि कोणतीही त्रुटी राहू नये, या उद्देशाने आयोगाने ही मुदत ८ ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. या मुदतवाढीचा थेट परिणाम मसुदा मतदार यादी प्रसिद्ध करण्याच्या तारखेवरही झाला आहे. यापूर्वी ५ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केली जाणारी मसुदा मतदार यादी आता १७ ऑगस्ट रोजी जाहीर केली जाणार आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मतदार यादीतील सर्व नोंदी अचूक असाव्यात, यासाठी निवडणूक आयोग विशेष खबरदारी घेत असून, या वाढीव कालावधीत जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या मतदानाची नोंदणी आणि पडताळणी करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
