Category: बातम्या

  • रत्नागिरी अभ्युदयनगर येथील बेघर निवारा केंद्रातील वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू

    रत्नागिरी अभ्युदयनगर येथील बेघर निवारा केंद्रातील वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू

    रत्नागिरी : शहरातील अभ्युदयनगर येथील आधार बेघर निवारा केंद्रात आश्रय घेतलेल्या ६२ वर्षीय दिलीप रामचंद्र भोसले यांचा उपचारादरम्यान १७ जून रोजी सायंकाळी ५.३५ वाजता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. भोसले यांना अनेक वर्षांपासून अर्धांगवायूचा त्रास होता. या घटनेची माहिती सिव्हिल हॉस्पिटलमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांना दिली. शिवानी संदीप पवार (वय ३९, रा. शिवाजीनगर, सुर्वे चाळ, रत्नागिरी), ज्या आधार बेघर निवारा केंद्रात बेघर लोकांची देखभाल करतात, यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट २०२३ मध्ये पावसाळ्यात दिलीप रामचंद्र भोसले यांचे घर कोसळले होते. त्यामुळे ते बेघर झाले होते आणि त्यांना त्यांच्या बहिणीसह नातेवाईकांनी आधार बेघर निवारा केंद्रात दाखल केले होते.

    दिलीप भोसले यांना आधीपासूनच अर्धांगवायूचा त्रास होता. १० मे रोजी त्यांना त्रास अधिक वाढल्याने तात्काळ रत्नागिरीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. २६ मे रोजी त्यांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला होता आणि ते पुन्हा निवारा केंद्रात परतले होते.
    काल, १७ जून रोजी दुपारी ३.०० वाजताच्या सुमारास, त्यांची बहीण त्यांना जेवण्यासाठी उठवण्यासाठी गेली असता, त्यांच्यात कोणतीही हालचाल आढळली नाही. त्यानंतर, निवारा केंद्रातील कर्मचाऱ्यांनी तातडीने रुग्णवाहिकेने त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, सायंकाळी ५.३५ वाजता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.

    या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे.

  • रत्नागिरीत वृद्ध महिलेचा रुग्णालयात मृत्यू

    रत्नागिरीत वृद्ध महिलेचा रुग्णालयात मृत्यू

    रत्नागिरी : निरूळ बौध्दवाडी येथील रहिवासी असलेल्या ६८ वर्षीय लता जाधव यांचा काल, १५ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास रत्नागिरीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना मानेपासून छातीपर्यंत त्रास जाणवत होता.

    याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, निरूळ बौध्दवाडी येथीलच अस्मिता प्रदीप जाधव (वय ३०) यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मयत लता जाधव या त्यांच्या आत्ये सासू होत्या. १५ जून रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास दुपारचे जेवण करून लता जाधव या अस्मिता जाधव यांच्या घरी आराम करण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांना अचानकपणे मानेपासून छातीपर्यंत तीव्र वेदना होऊ लागल्या.
    वेदनेने त्रस्त झालेल्या लता जाधव यांना तात्काळ औषधोपचारासाठी रत्नागिरीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.

    या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.

  • देवरुखमध्ये सह्याद्रीनगर तिठा येथे मटका जुगारावर छापा; एकावर गुन्हा

    देवरुखमध्ये सह्याद्रीनगर तिठा येथे मटका जुगारावर छापा; एकावर गुन्हा

    संगमेश्वर : तालुक्यातील साडवली येथील सह्याद्रीनगर तिठा परिसरातून १८ जून रोजी सायंकाळी ४.२० वाजण्याच्या सुमारास देवरुख पोलिसांनी कल्याण मटका जुगार अड्ड्यावर छापा टाकत एकावर गुन्हा दाखल केला. ऋषिकेश भार्गव पुसाळकर (वय २८) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषिकेश पुसाळकर हा सह्याद्री नगर तिठ्याजवळील एस.टी. पिकअप शेडच्या आडोशाला गैरकायदा आणि विनापरवाना कल्याण मटका नावाचा जुगार स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी चालवत असल्याची गोपनीय माहिती देवरुख पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे, पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला.
    छाप्यादरम्यान, पोलिसांनी आरोपी ऋषिकेश पुसाळकर याला कल्याण मटका जुगाराचे साहित्य आणि रोख ताब्यात घेतली.

  • खेडमध्ये पिकअप – दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर; पिकअप चालक फरार

    खेडमध्ये पिकअप – दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर; पिकअप चालक फरार

    खेड: मुंबई-गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील लोटे माळ येथील हॉटेल आराधनासमोर ७ जून २०२५ रोजी रात्री भीषण अपघात झाला. गोवा बाजूकडे जाणाऱ्या लेनवर घडलेल्या या अपघातात २७ वर्षीय दुचाकीस्वार नितीन शरद म्हादलेकर गंभीर जखमी झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, अपघातानंतर पिकअप चालकाने घटनास्थळावरून पळ काढला.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ७ जून रोजी रात्रीच्या सुमारास (एम.एच. १२ एस.एफ ३६६३) पिकअप गाडी मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या दुपदरी महामार्गावर चिपळूण बाजूकडे जात होती. या गाडीचा चालक भाऊ बबन मरगळे (वय ३७, सध्या फरार) याने इंडिकेटर न देता अचानकपणे उजव्या बाजूच्या दुसऱ्या लेनवर गाडी घेतली. त्याचवेळी त्याच्या डाव्या बाजूने, लोटे बाजूकडे जाणाऱ्या (एम.एच. ०८ ए.टी. ४४८५) मोटरसायकलवरील चालक नितीन शरद म्हादलेकर यांची पिकअप गाडीच्या ड्रायव्हर साईडकडील मागील लोखंडी बंपरवर आणि साईडच्या लोखंडी पॅनेलवर जोरदार धडक बसली.

    या अपघातात नितीन म्हादलेकर यांना गंभीर आणि किरकोळ दुखापती झाल्या असून, त्यांची मोटरसायकलचे नुकसान झाले आहे. अपघातानंतर पिकअप चालक भाऊ बबन मरगळे हा घटनास्थळी न थांबता, जखमींना कोणतीही वैद्यकीय मदत उपलब्ध करून न देता पळून गेला.
    या प्रकरणी, खेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उदय संभाजी मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १८ जून २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी भाऊ बबन मरगळे अद्याप फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

  • रत्नागिरी : फणसोप येथे दुचाकी अपघातात मृत्यूप्रकरणी देवरुखातील तरुणावर गुन्हा

    रत्नागिरी : फणसोप येथे दुचाकी अपघातात मृत्यूप्रकरणी देवरुखातील तरुणावर गुन्हा

    रत्नागिरी : रत्नागिरी ते पावस रोडवरील लक्ष्मी केशवनगर फणसोप सडा येथील रस्त्यावर दुचाकी अपघातात २४ वर्षीय देवरुखातील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात १८ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धेश संदीप पर्शुराम (वय २४) हा त्याच्या ताब्यातील ॲक्टिव्हा मोटारसायकल (क्र. एम.एच.०१ डी.एफ. ३५२४) घेऊन त्याचा मित्र वैभव रघुनाथ पवार (वय ३०) याला सोबत घेऊन वायंगणी फाटा येथून फेरफटका मारण्यासाठी गेला होता. अपघातस्थळी रस्त्याची विशिष्ट परिस्थिती लक्षात न घेता, आरोपी सिद्धेशने ॲक्टिव्हा दुचाकी बेदरकारपणे, वेगात चालवली. यामुळे स्वतःच्या आणि इतराच्या जीवितास धोका निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

    गाडी घेऊन जात असताना, रस्त्यात अचानक जनावरे उभी असल्याने सिद्धेशने ॲक्टिव्हा दुचाकीला ब्रेक लावला. यामुळे गाडी स्लिप होऊन रस्त्यावर पडली आणि अपघात झाला. या अपघातात वैभव रघुनाथ पवार यांना किरकोळ दुखापती झाल्या, तर सिद्धेश पर्शुराम याला स्वतःच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर व किरकोळ दुखापती झाल्या. या दुखापतीच त्याच्या मृत्यूचे कारण ठरल्या.

    या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून सिद्धेश याच्यावर स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • ब्रेकिंग: देवरूख-पांगरी मार्गावर मृतावस्थेत आढळला बिबट्या

    ब्रेकिंग: देवरूख-पांगरी मार्गावर मृतावस्थेत आढळला बिबट्या

    संगमेश्वर: देवरूख-पांगरी येथे पायवाटेशेजारी आज सकाळी एका बिबट्याचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मानवी वस्तीजवळ बिबट्याचा वावर असल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

    आज सकाळी ग्रामस्थांना हा बिबट्या मृतावस्थेत आढळल्यानंतर त्यांनी तात्काळ वनविभागाला याची माहिती दिली. माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पाहणी केली. प्राथमिक अंदाजानुसार, भुकेमुळे बिबट्याचा मृत्यू झाला असावा असा कयास व्यक्त केला जात आहे.

    देवरूख येथील वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुढील कार्यवाहीसाठी मृत बिबट्याला देवरूख येथे नेले आहे. बिबट्याचा मानवी वस्तीजवळ वाढलेला वावर पाहता, ग्रामस्थांमध्ये सध्या चिंतेचे आणि भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने याबाबत योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

  • संगमेश्वर रामपेठ अंगणवाडीतर्फे वृक्षारोपण; पर्यावरणाच्या संरक्षणाचा संदेश

    संगमेश्वर रामपेठ अंगणवाडीतर्फे वृक्षारोपण; पर्यावरणाच्या संरक्षणाचा संदेश

    संगमेश्वर: संगमेश्वर येथील एकात्मिक बाल विकास प्रकल्प, देवरुख-संगमेश्वर अंतर्गत येणाऱ्या रामपेठ अंगणवाडीतर्फे परसात नावडी येथे वृक्षारोोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या उपक्रमात स्थानिक मान्यवर आणि ग्रामस्थांनी सहभाग घेतला.

    या कार्यक्रमाचे उद्घाटन नावडीच्या माजी सरपंच प्रज्ञा कोळवणकर यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी मा. सरपंच प्रज्ञा कोळवणकर आणि ग्रामपंचायत सदस्य प्रतीक्षा शेरे यांचे अंगणवाडीच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

    अंगणवाडीच्या सेविका पल्लवी शेरे यांनी याप्रसंगी पर्यावरणाचा समतोल राखणे, मानवी जीवनात प्राणवायूची गरज, फळे, सावली, फुले तसेच आरोग्याच्या दृष्टीने वनस्पतींचे महत्त्व याविषयी सविस्तर माहिती दिली. वृक्षारोपणाच्या या कार्यक्रमाला अंगणवाडीची बालके आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    यावेळी वृक्षारोपणाची गरज स्पष्ट करताना, सध्या महामार्गांच्या कामांमुळे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाल्याचे आणि त्याचा परिणाम म्हणून जमिनीत पाणी मुरवण्याची क्षमता कमी झाल्याचे नमूद करण्यात आले. वृक्षांमुळे केवळ ऑक्सिजनच नव्हे, तर जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची आणि जिरवून ठेवण्याची क्षमता वाढते. पिंपळ, वट, आंबा, नारळ यांसारख्या मोठ्या वृक्षांची मुळे प्रचंड प्रमाणात पाणी साठवून ठेवू शकतात. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला असला तरी, झाडांची संख्या कमी असल्याने बहुतांश पाणी वाहून नदी आणि समुद्राला मिळाले आहे. जमिनीतील पाण्याचे प्रमाण कमी असल्याने भविष्यात पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता असून, त्यासाठी वृक्षारोपण करणे अत्यंत आवश्यक असल्याचे महत्त्व प्रतिपादन करण्यात आले.
    कार्यक्रमाच्या शेवटी मदतनीस शीतल अंब्रे यांनी उपस्थित मान्यवर आणि उपस्थितांचे आभार मानले.

  • परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक वाटचालीत नवा संगीत अध्याय!

    परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक वाटचालीत नवा संगीत अध्याय!

    संगमेश्वर:- शंभर वर्षाहून जास्त काळ चिपळूण नगरीत अव्याहत ज्ञानदानाचे काम करणारी नावाजलेली शैक्षणिक संस्था म्हणजे परशुराम एज्युकेशन सोसायटी.प.ए.सो.काळानुसार अद्ययावत होत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाच्या हेतूने विज्ञान-तंत्रज्ञान, क्रीडा आणि सर्वांगीण प्रगतीसाठी टप्प्याटप्प्याने चित्रकला कक्ष,अद्ययावत प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळा, पेटंट इंग्रजी कोर्स, पंचकोशाधारित गुरुकुल विभाग आणि शिक्षण क्षेत्रातील अनेक नवी आव्हाने प्रयत्नपूर्वक यशस्वीरित्या पूर्ण करून ज्ञानदानाचे पवित्र कार्य करीत आहे.

    संस्थेचा एक अभिनव विचाराने सुरू झालेला विभाग म्हणजे पंचकोशाधारीत गुरुकुल. विद्यार्थ्यांना अनेक उपक्रमांच्या माध्यमातून अनुभवातून शिक्षण देत त्यांचे जीवन समृद्ध करणे हा गुरुकुल विभागाचा प्रधान हेतू.या गुरुकुल विभागामध्ये विद्यार्थ्यांच्या आवडी निवडीला, छंदांना प्रोत्साहन देत त्यांना संपन्न समृद्ध घडविण्याचा प्रयत्न विभागामार्फत केला जातो. विविध प्रकारची शिबिरे, व्यक्तिपरिचय, क्षेत्रभेटी आणि असे अनेक उपक्रम शालेय अभ्यासक्रमाशी जोडत विद्यार्थ्यांना स्वतःला आजमावून बघायची संधी इथे मिळते. विद्यार्थ्यांना आवर्जून नियमित संगीत प्रशिक्षणही येथे दिले जाते. याचाच एक भाग म्हणून कै.श्रीकृष्ण चिंतामण तथा अप्पासाहेब दांडेकर यांच्या कुटुंबीयांच्या देणगीतून गुरुकुल विभागात विविध प्रकारच्या वाद्यांनी अद्ययावत सुसज्ज संगीत कक्ष तयार करण्यात आला आहे. या संगीत कक्षाचे उद्घाटन जागतिक संगीत दिवसाचे औचित्य साधून शनिवार २१ जून २०२५  या दिवशी जेष्ठ अर्थ सल्लागार जयंतराव विद्वांस आणि कैलासवासी श्री.आप्पासाहेब दांडेकर यांच्या कुटुंबीयांच्या  प्रमुख उपस्थितीत सकाळी साडेअकरा वाजता संपन्न होणार आहे.

    विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच भारतीय पारंपारिक अभिजात संगीताचा परिचय व्हावा, संगीत प्रत्यक्ष प्रक्रियेतून शिकता, अनुभवता यावे, अभिजात संगीत ऐकण्याची सवय लागावी अशा उद्देशाने या संगीत कक्षाच्या माध्यमातून भविष्यात काही उपक्रमांचा नियोजन संस्थेच्या सर्वच विभागातील विद्यार्थ्यांसाठी करण्याचे संस्थेचे नियोजन आहे.