Category: बातम्या

  • रत्नागिरी जिल्ह्यात २,७५० दहीहंड्या फुटणार

    रत्नागिरी जिल्ह्यात २,७५० दहीहंड्या फुटणार

    रत्नागिरी : ‘गोविंदा आला रे’ या जयघोषात आणि थरावर थर रचत, रत्नागिरी जिल्हा १६ ऑगस्ट २०२५ रोजी दहीहंडीच्या रंगात रंगून जाणार आहे. यावर्षी जिल्ह्यात दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला असून तब्बल २,७५० दहीहंड्यांचे आयोजन करण्यात आले आहे. यात सार्वजनिक दहीहंड्यांपेक्षा खाजगी दहीहंड्यांचे प्रमाण अधिक आहे.

    सार्वजनिक दहीहंड्यांमध्ये लांजा तालुका अव्वल ठरला आहे. लांजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक ८२ सार्वजनिक दहीहंड्या बांधण्यात येणार आहेत. राजापूरमध्ये ४० आणि दापोलीमध्ये ३८ दहीहंड्यांचा थरार पाहायला मिळणार आहे. खेडमध्ये २४, चिपळूणमध्ये १७, देवगडमध्ये १२, पूर्णगडमध्ये १५, संगमेश्वरमध्ये ८ अशी संख्या आहे. सर्वात कमी सार्वजनिक दहीहंड्यांमध्ये अलोरे-शिरगाव ६, सावर्डे २, गुहागर ३, बाणकोट १, दाभोळ ४, मंडणगड ३ अशा नोंदी आहेत.

    खाजगी दहीहंड्यांमध्ये बाणकोट शहराने बाजी मारली असून तब्बल ३८९ हंड्या येथे लावल्या जाणार आहेत. त्यापाठोपाठ दापोली ३२७ आणि चिपळूण ३२० दहीहंड्या आहेत. विशेष म्हणजे, राजापूरमधील नाटे पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकही सार्वजनिक दहीहंडी नसतानाही ३० खाजगी दहीहंड्यांचा उत्साह दिसणार आहे. त्याखालोखाल गुहागर २२५, दाभोळ २५७, मंडणगड १२२, संगमेश्वर १२०, खेड १५० अशा नोंदी आहेत. सर्वात कमी खाजगी दहीहंड्या अलोरे-शिरगाव २५, सावर्डे ५२, राजापूर ७०, देवगड ५७ येथे आहेत.

    रत्नागिरी शहरात १३ सार्वजनिक आणि ९४ खाजगी दहीहंड्या नोंदल्या गेल्या आहेत, तर ग्रामीण भागात १ सार्वजनिक आणि १२० खाजगी दहीहंड्यांचा उत्सव होणार आहे. या सर्व दहीहंड्यांमुळे रत्नागिरी जिल्ह्यात गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. उत्सव सुरक्षित आणि आनंददायी पार पडावा यासाठी पोलीस प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे

  • रत्नागिरीत तंबाखूच्या व्यसनामुळे व्यक्तीचा मृत्यू

    रत्नागिरीत तंबाखूच्या व्यसनामुळे व्यक्तीचा मृत्यू

    रत्नागिरी : तंबाखू खाण्याच्या व्यसनामुळे आणि आजारामुळे एका व्यक्तीचा रत्नागिरीतील शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. उमेश सुरेश शेट्ये (वय ५३, रा. राधाकृष्णनगर, रत्नागिरी) असे मृताचे नाव आहे.

    त्यांना अशक्तपणा आणि अन्न पचन न होण्याच्या तक्रारीमुळे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

  • जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा शिरगाव येथे रक्षाबंधन उत्साहात

    जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा शिरगाव येथे रक्षाबंधन उत्साहात

    रत्नागिरी: जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा, शिरगाव मराठी येथे विद्यार्थ्यांमध्ये समता, बंधुता, श्रमप्रतिष्ठा, स्त्री-पुरुष समानता, स्व ची जाणीव आणि नातेसंबंधांची मानवी मूल्ये रुजवण्याच्या उद्देशाने रक्षाबंधन हा सण आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
    या उपक्रमासाठी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी स्वतः राख्या तयार केल्या. विशेष म्हणजे, रक्षाबंधनाच्या दिवशी मुलींनी मुलांना आणि मुलांनी मुलींनाही राख्या बांधल्या. यामुळे केवळ भाऊ-बहिणीच्या नात्याचीच नव्हे, तर सर्व मानवी नात्यांची महती अधोरेखित झाली. या अनोख्या उपक्रमाची संकल्पना शिक्षिका सौ. नीलिमा इंदुलकर यांनी मांडली.
    हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक सौ. मोहिते, तसेच शिक्षिका सौ. धामापुरकर आणि सौ. गोरे यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांमध्ये समानतेची भावना रुजवणारा हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला.

  • बदलत्या काळात सायबर शिक्षण महत्त्वाचे : डॉ. अक्षय पाठक

    बदलत्या काळात सायबर शिक्षण महत्त्वाचे : डॉ. अक्षय पाठक

    रत्नागिरी : बदलत्या काळात माणसाकडून होणाऱ्या चुकांमुळे सायबर गुन्हे घडतात. सायबर गुन्हे घडायचे नसतील, तर आपण जागरूक राहणं आवश्यक आहे. त्याचबरोबर निर्माण होणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाण्याचे धाडस हे प्रत्येकामध्ये निर्माण झाले पाहिजे. यासाठी सायबर शिक्षण महत्त्वाचे आहे. असे मत डॉ. अक्षय पाठक यांनी व्यक्त केले.  नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या रत्नागिरी येथील नवनिर्माण ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात आयोजित  मार्गदर्शन कार्यक्रमात सायबर सुरक्षा आपली जबाबदारी  या विषयावर डॉ. अक्षय पाठक बोलत होते.

    या कार्यक्रमात पुढे बोलताना मोबाईल हा युवकांचा मित्र बनला आहे. आणि या मोबाईलच्या माध्यमातून अनेक गुन्हे घडतात वेगवेगळ्या प्रकारच्या फसवू नका घडतात. आपल्याकडून काही चूक झाल्यास यातून कसे मार्ग  काढायचे मोबाईलचा वापर योग्य पद्धतीने करून घडणाऱ्या गुन्ह्यांवर आळा घालू शकतो याबद्दलचे मार्गदर्शन डॉक्टर फाटक यांनी केले.

    याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय गवाळे यांनी अध्यक्षीय मनोगतातून या समाज माध्यमांचा वापर करताना जागरूक असणे आवश्यक आहे. माहितीचे आदानप्रदान करताना घ्यावयाची काळजी यासंदर्भात मार्गदर्शन केले.

    याप्रसंगी महाविद्यालयातील शिक्षक वृंद त्याचबरोबर शिक्षकेतर कर्मचारी आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित राहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक निकिता नलावडे तर आभार प्राध्यापक श्रेया राऊत यांनी मानले.

  • रत्नागिरी काळबादेवी येथे बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला

    रत्नागिरी काळबादेवी येथे बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला

    रत्नागिरी : काळबादेवी येथील समुद्रात मासेमारी करताना बुडून बेपत्ता झालेल्या ४५ वर्षीय तरुणाचा मृतदेह शुक्रवारी सायंकाळी सापडला. गजानन महादेव पेडणेकर (४५, रा. नेवरे काजीरभाटी) असे मृताचे नाव असून, या प्रकरणी जयगड सागरी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

    ही दुर्दैवी घटना ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. पेडणेकर हे काळबादेवी येथील जेटीजवळ आपल्या बोटीवर मासेमारी करत होते. त्याचवेळी त्यांचा तोल जाऊन ते समुद्रात पडले आणि बेपत्ता झाले. ही बाब लक्षात आल्यानंतर नातेवाईक आणि गावकऱ्यांनी त्यांचा शोध सुरू केला.

    अखेरीस शुक्रवारी सायंकाळी त्यांचा मृतदेह समुद्रात मृतावस्थेत आढळला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आवश्यक कार्यवाही केली. मासेमारी करताना तोल जाऊन समुद्रात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी जयगड सागरी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

  • चिपळुणातील पोलिसांना नागालँड आणि मणिपूरच्या विद्यार्थिनींनी बांधल्या राख्या

    चिपळुणातील पोलिसांना नागालँड आणि मणिपूरच्या विद्यार्थिनींनी बांधल्या राख्या

    ‘श्री. गणेश आगमन गीत’ गाऊन उपस्थितांना  दिला सुखद धक्का

    चिपळूण – नागालँड आणि मणिपूर येथून शिक्षणासाठी चिपळूणमध्ये आलेल्या विद्यार्थिनींनी आज चिपळूण पोलीस ठाण्यात एक आगळावेगळा ‘रक्षाबंधन’ उत्सव साजरा केला. पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विद्यार्थिनींनी पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना राख्या बांधून त्यांच्याप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली.

    चिपळूण पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागालँड व मणिपूर येथील अनेक विद्यार्थिनी एका छात्रावासात राहतात. शिक्षणानिमित्त घरापासून दूर असलेल्या या विद्यार्थिनींना आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने पोलिसांमध्ये आपले कुटुंबीय दिसले. त्यांनी आज (९ ऑगस्ट २०२५) चिपळूण पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी, उप विभागीय पोलीस अधिकारी, चिपळूण श्री. राजेंद्रकुमार राजमाने आणि पोलीस निरीक्षक श्री. फुलचंद मेंगडे यांना राख्या बांधल्या. त्याचबरोबर, चिपळूण पोलीस ठाण्यातील उपस्थित सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनाही राख्या बांधून हा सण उत्साहात साजरा केला.

    या प्रसंगी विद्यार्थिनींनी केवळ राख्याच बांधल्या नाहीत, तर मराठीतील ‘श्री. गणेश आगमन गीत’ गाऊन उपस्थितांना सुखद धक्का दिला. त्यांच्या या प्रेमळ कृतीमुळे सर्व पोलीस अधिकारी भारावून गेले.
    यावेळी पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. नितीन बगाटे यांनी या विद्यार्थिनींचे विशेष कौतुक केले. आपल्या घरापासून दूर राहूनही त्यांनी मराठी संस्कृती आत्मसात केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. त्यांनी सर्व विद्यार्थिनींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. या कार्यक्रमामुळे पोलीस आणि नागरिक यांच्यातील संबंध अधिक दृढ झाले असून, एक सकारात्मक संदेश समाजात गेला आहे.

  • राजापूर : मक्याच्या सालीपासून विद्यार्थ्यानी बनवल्या इको-फ्रेंडली राख्या

    राजापूर : मक्याच्या सालीपासून विद्यार्थ्यानी बनवल्या इको-फ्रेंडली राख्या

    पर्यावरणपूरक सण साजरा करण्याचा संदेश

    राजापूर : शिशण प्रसारक मंडळाच्या आरएसपीएम शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘हिरवी राखी आणि सलींची सखी’ या रम्य उपक्रमांतर्गत मक्याच्या कणसाच्या सालींचा वापर करून पर्यावरणपूरक राख्या तयार केल्या.

    मक्याच्या कणसातील दाणे काढल्यानंतर उरलेल्या हिरव्या सालींची फुलं बनवून विद्यार्थ्यांनी विविध आकारांच्या आकर्षक पाकळ्या तयार केल्या. त्या पाकळ्यांना एकत्र करून पर्यावरणपूरक राख्या बनवण्यात आल्या. राखी बांधण्यासाठी लागणारा दोर रामभाऊ गव्हाणकर यांनी उपलब्ध करून दिला, तर फुलांच्या सालींचा साठा संदीप पाटील यांनी दिला.

    हा उपक्रम आरएसपीएम शाळेचे मुख्याध्यापक निलेश पवार आणि सहकारी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांनी केवळ सृजनशीलतेचा आनंद घेतला नाही, तर पुनर्वापराचे महत्त्व आणि पर्यावरणपूरक सण साजरा करण्याचा संदेशही दिला.

  • राजापूर: नवोदय विद्यालय पडवे येथे जेएसडब्ल्यू सीएसआर फंडातून  300फॅन व इलेक्ट्रिक  10 गिझर वाटप

    राजापूर: नवोदय विद्यालय पडवे येथे जेएसडब्ल्यू सीएसआर फंडातून  300फॅन व इलेक्ट्रिक  10 गिझर वाटप

    आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत करण्यात आले वितरण

    राजापूर प्रतिनिधी : राजापूर तालुक्यातील पडवे येथे असलेल्या नवोदय विद्यालय पडवे तालुका राजापूर येथे जेएसडब्ल्यू कंपनीच्या सीएसआर फंडातून येथील विद्यार्थ्यांची गैरसोय ओळखून पालकमंत्री उदय सामंत लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत आणि रत्नागिरीचे प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्या पाठपुराव्यानंतर 300 फॅन आणि दहा इलेक्ट्रिक गिझर सुपूर्त करण्यात आले. हा कार्यक्रम आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

    केंद्रातील जिल्हास्तरीय असणारे राजापूर मधील नवोदय विद्यालय हे एकमेव विद्यालय आहे या ठिकाणी मेरिटमधील विद्यार्थी चांगल्या दर्जाचे शिक्षण घेऊन उच्चस्तरावरती या तालुक्याचा आणि जिल्ह्याचे नाव भूषवत आहे येथील विद्यार्थ्यांना गरम पाणीची गैरसोय होत असल्याने त्यांना वेळोवेळी आजारी पडावे लागत होते. त्याचप्रमाणे त्यांची कमतरता येथील निवासी विद्यार्थ्यांना होत होती ही गरज ओळखून आमदार किरण सामंत यांनी डब्ल्यू यांच्या कंपनीच्या माध्यमातून हे फॅन आणि गिझर देण्याचा शब्द दिला होता सदस्य रत्नागिरीचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांच्याशी झाल्यानंतर रत्नागिरीचे प्रांत अधिकारी जीवन देसाईने यांनी या विषयाचा पाठपुरावा करून अखेर आज दिलेल्या शब्दाप्रमाणे त्यांना 300 फॅन आणि दहा इलेक्ट्रिक गिझर नवोदय विद्यालयाच्या प्राचार्यांकडे सुपूर्त केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमदार किरण सामंत यांनी नवोदय विद्यालयाचे कौतुक केले येथील विद्यार्थी घडवण्यासाठी येथील शिक्षकांचे मेहनत पाहता त्यांचे करावे तेवढे कौतुक थोडे आहे असेही ते सांगायला विसरले नाही. या नवोदय विद्यालयातून आयपीएस आयएएस अधिकारी घडावेत आणि लांजा राजापूर रत्नागिरी जिल्ह्याचे नाव उज्वल करावं ही प्रामाणिकपणाची इच्छा असल्याचे त्यांनी मत व्यक्त केला. नवोदय विद्यालयाचे विविध समस्या बाबत ही चर्चा करण्यात आली असलेल्या समस्या लवकरात लवकर पूर्ण करू असा शब्दही यावेळेस त्यांनी दिला.

    या कार्यक्रमाप्रसंगी लांजा राजापूर विधानसभेचे आमदार किरण सामंत माजी शिक्षण सभापती विलास चाळके, जिल्हा नियोजन समिती सदस्य दीपक नागले, रवी नागरेकर आरडीसी बँकेचे संचालक मुन्ना खामकर, जेएसडब्ल्यू फौंडेशनच्या संपदा धोपटकर ,प्राचार्य एम बसवराज, नायब तहसीलदार सरपरे, निलेश सुर्वे ,निनाद अवसरे, बाबू अवसरे, जानवी गावकर, मनोज आडविलकर ,राजन कोंडेकर, नंदू मीरगुले,दिनेश पवार यांच्यासहित पालक विद्यार्थी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते

  • शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे राज्यव्यापी सामूहिक रजा आंदोलन; नागपूरच्या घटनेचा निषेध

    शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे राज्यव्यापी सामूहिक रजा आंदोलन; नागपूरच्या घटनेचा निषेध

    रत्नागिरी – नागपूर येथे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांवर चौकशीपूर्व कारवाई न करता थेट अटक केल्याच्या निषेधार्थ अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेने आज, शुक्रवार ८ ऑगस्टपासून राज्यभर सामूहिक रजा आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनामुळे राज्यातील शिक्षण विभागाची सर्व कार्यालये ठप्प झाली आहेत. अधिकाऱ्यांच्या या आंदोलनाला इतर संघटनांकडूनही पाठिंबा मिळण्याची शक्यता असून, सोमवारपासून आंदोलनाची तीव्रता वाढण्याची चिन्हे आहेत.

    या घटनेमुळे संतप्त झालेल्या संघटनेने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षणमंत्री, शिक्षण सचिव आणि शिक्षण आयुक्त यांना यापूर्वीच निवेदन पाठवून सत्ताधाऱ्यांकडून शिक्षण क्षेत्रातील अधिकाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायकारक वागणुकीचा निषेध नोंदवला आहे. बोगस शालार्थ आयडी प्रकरणात नागपूर येथील शिक्षण विभागातील उपसंचालक आणि इतर अधिकाऱ्यांना विनाचौकशी अटक करण्यात आल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
    या पार्श्वभूमीवर, राज्यभरातील वर्ग एक आणि वर्ग दोनचे सुमारे शंभर अधिकारी शिक्षण संचालकांसह पुणे येथील शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर दिवसभर आंदोलन करत होते. जिल्हास्तरावरही जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देऊन आंदोलन सुरू करण्यात आले.
    या आंदोलनाद्वारे नागपूर येथील घटनेची चौकशी करून निर्दोष अधिकाऱ्यांची तात्काळ मुक्तता करण्याची, भविष्यात कोणत्याही अधिकाऱ्यावर कारवाई करण्यापूर्वी चौकशी प्रक्रिया पूर्ण करण्याची, तसेच शिक्षण प्रशासनातील अधिकाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी शासनाने स्पष्ट दिशा-निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे.
    याबाबत बोलताना संघटनेचे अध्यक्ष शेषराव बडे यांनी, “अधिकारी शासनाच्या धोरणांची अंमलबजावणी करत असताना झालेल्या त्रुटींवर योग्य चौकशीऐवजी थेट गुन्हे नोंदवणे आणि अटक करणे अत्यंत दुर्दैवी आहे,” असे म्हटले आहे. विभागाच्या इतिहासात अधिकाऱ्यांना अशा प्रकारे राज्यव्यापी आंदोलन करण्याची वेळ पहिल्यांदाच आल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • दापोली : मासेमारी करताना बुडून वृद्धाचा मृत्यू

    दापोली : मासेमारी करताना बुडून वृद्धाचा मृत्यू

    दापोली : तालुक्यातील इनामपांगारी गावाजवळील नदीपात्रात ५८ वर्षीय फैजअली म्हामुद नांदगावकर यांचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, मासेमारी करताना बुडल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त होत आहे.

    ८ ऑगस्ट रोजी दुपारी ते मासेमारीसाठी गेले होते, मात्र रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. आज सकाळी त्यांचा मृतदेह नदीपात्रात तरंगताना सापडला.

    दापोली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे इनामपांगारी गावात हळहळ व्यक्त होत आहे.