बुधवारी सकाळी ओणी येथे अंत्यसंस्कार
राजापूर : तालुक्यातील नूतन विद्यामंदिर ओणीचे माजी प्राचार्य गुरुवर्य शहाजीराव भाऊराव खानविलकर (वय 85) यांचे मंगळवारी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने शैक्षणिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. एड. गुरुदत्त खानविलकर यांचे ते वडील होत.
मूळचे लांजा तालुक्यातील गोळवशी गावचे रहिवासी असलेले शहाजीराव खानविलकर ओणी येथे स्थायिक झाले होते. ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या नूतन विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयातून ते सेवानिवृत्त झाले होते. ओणी प्रशाळेच्या निर्मितीत व जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. शिस्तप्रिय, विद्यार्थ्यांप्रती आत्मीयता असलेले आणि विद्यार्थीप्रिय शिक्षक अशी त्यांची ख्याती होती.
त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांना विविध पुरस्कार मिळाले होते. ‘मानाचा गुरुवर्य’ पुरस्कारानेही त्यांचा गौरव झाला होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो विद्यार्थी उच्च पदांवर पोहोचले आहेत.
राजापूर तालुका मराठा समाज सेवा संघात खजिनदार म्हणून त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. राजापूरच्या सामाजिक व शैक्षणिक कार्यातही त्यांचा मोठा सहभाग होता. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठिक नव्हती. खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच मंगळवारी दुपारी त्यांना घरी आणण्यात आले, मात्र सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
खानविलकर यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी 10 वाजता ओणी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून, नातवंडे, भाऊ व पुतणे असा मोठा परिवार आहे.
त्यांच्या जाण्याने एक समर्पित शिक्षक आणि मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
नूतन विद्यामंदिर ओणीचे माजी प्राचार्य गुरुवर्य शहाजीराव खानविलकर यांचे निधन
