गुहागर: परिसर पर्यावरणाच्या दृष्टीने अधिक सुरक्षित व सुजलाम सुफलाम करण्यासाठी केंद्र सरकारशी संलग्र असलेल्या एचएसबीसी बँक पुरस्कृत सीडीडी इंडिया (बंगळूर) या एनजीओ कंपनीच्या वतीने गुहागर नगर पंचायत कार्यक्षेत्रातील डंपिंग ग्राऊंडमध्ये मलगाळ प्रक्रिया केंद्र उभे केले जाणार आहे.
हा प्रकल्प कोकणातील एकमेव प्रकल्प असून गुहागरबरोबर मालवण येथेही या प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे.
सीडीडी इंडिया कंपनीच्या वतीने कोकणातील समुद्रकिनारी पर्यावरण संरक्षणाचे काम सुरू आहे. यातून त्या त्या ठिकाणी होणाऱ्या वातावरण बदलाचे निरीक्षण व परीक्षण या कंपनीच्या वतीने केले जात आहे. यासाठी एचएसबीसी बँकेतर्फे आर्थिक सहाय्य केले जात असून केंद्र सरकारच्या निर्देशानुसार या प्रकल्पाची उभारणी सुरू आहे.
गेले काही महिने गुहागर शहरातील गटारे, नाले यांची तपासणी करण्यात आली होती. यामध्ये इ-कोलायचे प्रमाण दिसले होते. यामुळे समुद्र किनारपट्टी अधिक सुरक्षित करण्यासाठी व गुहागर नगर पंचायतीचा घनकचरा प्रकल्प जागा अधिक सुरक्षित असल्याने कोकणातील पहिला प्रकल्प गुहागर येथे उभारण्याचे निश्चित करण्यात आले. यासाठी गुहागर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी स्वप्रील चव्हाण, नगर अभियंता विजय भूतल, स्वच्छता निरीक्षक प्रवीण जाधव, अभियंता आशीष खांबे यांना बंगळूर येथे तीन दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर गुहागर नगर पंचायतीच्या घनकचरा प्रकल्पामध्ये या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे.
एफएसटीपी प्रकल्प हा शौचालयाच्या मैलापासून खत निर्मितीबरोबर त्यामधून वेगळे करण्यात येणाऱ्या पाण्याचा वृक्षसंवर्धनासाठी वापर करण्यात येणार आहे. गुहागर शहरातून संकलन होणाऱ्या शौचालयाच्या टाकीतील मैलाच्या प्रमाणानुसार या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. यासाठी एन्व्हायर्न्मेंट इंजिनिअरिंगवर आधारित सोलराइजचा वापर करण्यात आला आहे, या प्रकल्पामधील आणण्यात येणाऱ्या शौचालयाच्या मलावर जास्त उष्णता देऊन त्या मलाची कुजण्याची प्रक्रिया लवकर करण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. हनी वॅगनच्या साह्याने आणण्यात येणाऱ्या शौचालयाच्या मलापासून सोनखत निर्मिती केली जाणार आहे. तसेच यामधील पाणी फिल्टर करून या पाण्याचा वापर झाडांसाठी केला जाणार आहे.
मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण यांनी हा प्रकल्प गुहागरमध्ये आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सोनखत व पाण्याचा वापर यातून तयार प्रकल्पात वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन करण्याचे नियोजन केले आहे. यामुळे भविष्यात गुहागर नगर पंचायतीचा घनकचरा प्रकल्प एका उद्यानाप्रमाणे बहरणार आहे. प्रकल्पात शहरातून जमा होणाऱ्या ओल्या कचऱ्यापासून ७ दिवसांत ७० किलोपर्यंत कंपोस्ट खताची निर्मिती केली आहे. सुक्या कचऱ्यातील प्लास्टिकचे संकलन करून ते बाहेर पाठवले जाणार आहे. यामुळे गुहागरचा घनकचरा प्रकल्प कोकणासाठी दिशादर्शक ठरणार आहे.
या प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभाला एचएसबीसी इंडियाचे बँकच्या उपाध्यक्ष रोमित सेन, सीडीडी इंडियाच्या हेड आदिती पांड्ये, सीडीडी इंडियाचे प्रोग्राम मॅनेजर इरफान उल्ला शरिफ, मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण व गुहागर नगर पंचायतीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
गुहागरमध्ये मैल्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प लवकरच






