रत्नागिरी: रत्नागिरी शहरानजीकच्या रत्नसागर रिसॉर्ट नुकसानभरपाई प्रकरणाचा गुंता दिवसेंदिवस वाढत आहे. गेले सहा महिने जिल्हा न्यायालयात या प्रकरणाचा ‘तारीख पे तारीख’ असा प्रवास सुरू असून, न्यायालयाने पुन्हा एकदा पुढील सुनावणीची नवीन तारीख दिली आहे. जिल्हा प्रशासनाला आता १२ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. जिल्हा न्यायालयाने पूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना नुकसानभरपाई देण्याचे किंवा त्यांची जंगम मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले होते. अचानक रिसॉर्ट बंद झाल्यामुळे सावंत यांना ९ कोटी २५ लाख रुपये इतकी मोठी नुकसानभरपाई जिल्हा प्रशासनाने द्यावी, असा स्पष्ट आदेश जिल्हा न्यायालयाकडून देण्यात आला होता.
या कारवाईसंदर्भात तत्काळ स्थगिती मिळवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आणि त्यात त्यांना यशही मिळाले. बुधवारी जिल्हा न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान प्रशासनाला २४ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती, जी आता वाढवून १२ नोव्हेंबर करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अंतिम निकाल कुणाच्या बाजूने लागतो, याबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.





