GRAMIN SEARCH BANNER

आकाशात शनिवारी दुर्मिळ ‘प्लॅनेट परेड’

Gramin Varta
65 Views

मुंबई: आकाश निरीक्षणाची आवड असलेल्या नागरिकांसाठी एक दुर्मिळ आणि आकर्षक खगोलीय घटना अनुभवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.येत्या १८ एप्रिल २०२६ रोजी पहाटे ‘प्लॅनेट परेड’ अर्थात ग्रहांची रांग पाहायला मिळणार आहे.

या वेळी बुध, मंगळ, शनि आणि नेपच्यून हे ग्रह पूर्व दिशेला एकाच रेषेत जवळजवळ दिसणार आहेत. अनेक ग्रह एकाच वेळी आकाशात एकाच दिशेत दिसण्याच्या या घटनेला ‘प्लॅनेट परेड’ म्हटले जाते. प्रत्यक्षात हे ग्रह एका सरळ रेषेत नसले तरी पृथ्वीवरून पाहताना ते एकाच भागात असल्याचा भास होतो. अशा घटना क्वचित घडतात आणि खगोलप्रेमींसाठी विशेष आकर्षण ठरतात.

या पार्श्वभूमीवर मराठी विज्ञान परिषद, अमरावती विभागांतर्गत कार्यरत स्टार गेझर क्लबतर्फे ऑर्किड स्कूल येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी विशेष आकाश निरीक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

ही खगोलीय घटना पहाटे ०४.४५ ते ०५.२० या वेळेत पूर्व ते ईशान्य दिशेदरम्यान क्षितिजाजवळ पाहता येणार आहे. या वेळेत आकाश तुलनेने अंधारात असल्याने ग्रह अधिक स्पष्ट दिसण्याची शक्यता आहे.

खगोलप्रेमींनी निरीक्षणासाठी पूर्व दिशेला मोकळे आकाश असलेले ठिकाण निवडावे. शक्य असल्यास दुर्बीण किंवा बायनॉक्युलरचा वापर करावा. हवामान स्वच्छ असल्यासच हे दृश्य अधिक स्पष्टपणे पाहता येईल.

१८ एप्रिल रोजीची ही ग्रहांची रांग खगोलप्रेमींसाठी एक अनोखी पर्वणी ठरणार असून अशा दुर्मिळ घटनांचे प्रत्यक्ष निरीक्षण केल्याने विज्ञानाविषयीची जिज्ञासा वाढते आणि विश्वाबद्दलची समज अधिक व्यापक होते.

या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आकाशीय सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्रा. प्रवीण गुल्हाने आणि खगोल विभाग प्रमुख विजय गिरुळकर यांनी केले आहे.

Total Visitor Counter

3294998
Share This Article