सामान्य माणसाच्या विकासासाठी गाव विकास समिती राबविणार ‘झिरो बजेट इलेक्शन’ची नवी संकल्पना
देवरुख, (विशेष प्रतिनिधी): रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख नगरपंचायत नगराध्यक्ष निवडणुकीसाठी गाव विकास समितीने जोरदार तयारी सुरू केली आहे. नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित असल्याने, गाव विकास समितीने विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवत ही निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे. नगराध्यक्ष पदासाठी गाव विकास समितीकडून सौ. अनघा कांगणे आणि सौ. दिक्षा खंडागळे- गीते यांच्या नावाची चर्चा असून, या दोन्ही सुशिक्षित उमेदवारांपैकी एकाला उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
पैशांच्या राजकारणाला ‘झिरो बजेट इलेक्शन’ने उत्तर
गाव विकास समितीने या निवडणुकीत एक अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि लोकाभिमुख संकल्पना आणली आहे.ती म्हणजे ‘झिरो बजेट इलेक्शन’. संघटनेचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांच्या संकल्पनेतून ही मोहीम गाव विकास समिती लढत असलेल्या जिल्हा परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत लोकहितासाठी राबवली जात आहे.
विकास हाच केंद्र बिंदू ठेवून ही निवडणूक लढली जाणार असून, टीका-टिप्पणी करण्याऐवजी पैशांच्या राजकारणाला या नव्या संकल्पनेने उत्तर दिले जाणार असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.
शिक्षणाला प्राधान्य: गाव विकास समितीने नगराध्यक्ष पदासाठी सुशिक्षित उमेदवार मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे सौ. अनघा कांगणे आणि सौ. दिक्षा खंडागळे गीते यांच्यापैकी एकाची उमेदवारी जवळपास निश्चित आहे.
देवरुख नगरपंचायत निवडणूक गाव विकास समितीचे सरचिटणीस डॉ. मंगेश कांगणे यांच्या नेतृत्वाखाली लढली जाणार आहे. याशिवाय, संघटनेचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे, अध्यक्ष उदय गोताड आणि राहुल यादव यांचे मार्गदर्शन या निवडणुकीसाठी लाभणार आहे.
‘विकासाची गॅरंटी आणि पारदर्शक कारभाराची हमी’
या निवडणुकीतील भूमिकेबाबत बोलताना गाव विकास समितीचे सरचिटणीस डॉ. मंगेश कांगणे म्हणाले,
“विकासाची गॅरंटी आणि पारदर्शक कारभाराची हमी ही आमची भूमिका आहे. देवरुख नगरपंचायत नगराध्यक्ष निवडणूक साठी गाव विकास समिती उमेदवार देणार असून जनतेतून थेट नगराध्यक्ष असल्याने जनतेच्या प्रश्नांची जाण असणारा उमेदवार आम्ही उभा करू. गाव विकास समितीचे नेतृत्व याबाबत निर्णय लवकरच जाहीर करेल.” – डॉ. मंगेश कांगणे, सरचिटणीस, गाव विकास समिती, रत्नागिरी जिल्हा
एकंदरीत, गाव विकास समितीने देवरुख नगरपंचायत निवडणुकीत विकासाचा अजेंडा आणि झिरो बजेट इलेक्शनची नवीन दिशा देऊन एक वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.







