‘अदानी’ किंवा महावितरणने नुकसान भरपाई द्यावी : सरपंच फय्याज मुकादम
रत्नागिरी: मजगांव येथे, एका खासगी कंपनीच्या (अदानी) स्मार्ट मीटरच्या अतिशय चुकीच्या वायरिंगमुळे एका महिलेला विजेचा गंभीर शॉक लागल्याची धक्कादायक घटना ४ नोव्हेंबर २०२५ रोजी घडली आहे. या जीवघेण्या घटनेत, घरातील पाण्याच्या मोटारीला वीजप्रवाह उतरल्याने, शॉक लागून महिलेचा हात मोडला असून तिच्यावर मिरज येथील रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
शमीम इबजी, (रा. मजगांव, रत्नागिरी) असे जखमी महिलेचे नाव आहे. गेल्या काही महिन्यांपासून वीज बिलांमध्ये मोठी वाढ झाल्याने आधीच त्रस्त असलेल्या मजगांव येथील नागरिकांना, आता थेट जीवावर बेतणाऱ्या या गंभीर घटनेने मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घरातील पाण्याच्या मोटारीला अचानक गंभीर वीजप्रवाह उतरला. मोटारीचा स्पर्श होताच शमीम इबजी यांना जोरदार शॉक बसला आणि त्यातच त्यांचा हात मोडला.
या घटनेनंतर, खासगी वायरमन आणि सरकारी वायरमन यांनी एकत्र येऊन मीटर आणि घरातील वायरिंगची तपासणी केली. तपासणीत, स्मार्ट मीटरची वायरिंग पूर्णपणे चुकीची असल्याचे उघड झाले. हा गंभीर प्रकार लक्षात येताच, मजगांवचे सरपंच यांनी तात्काळ येथील विद्युत उपअभियंता देशमुख यांच्याकडे तक्रार नोंदवली आहे. मात्र, घटनेला काही दिवस उलटूनही संबंधित विभागातील कोणताही अधिकारी अथवा कर्मचारी पाहणीसाठी घटनास्थळी आलेला नसल्याचे सरपंच यांनी सांगितले.
‘अदानी’च्या मीटरमुळे एका बाजूला अफाट बिलांचा शॉक आणि दुसऱ्या बाजूला चुकीच्या वायरिंगचा जबर झटका बसल्याने मजगावामध्ये संतापाचे वातावरण आहे. या घटनेमुळे शमीम इबजी यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, ही संपूर्ण नुकसान भरपाई ‘अदानी’ कंपनीने किंवा महावितरण कंपनीने द्यावी, अशी जोरदार मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
या मागणीसाठी, मजगांव येथील शिवसेना पदाधिकारी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेणार आहेत. सरपंच तथा शिवसेना विभाग संघटक फैयाज मुकादम यांनी ही माहिती दिली. या घटनेची गंभीर दखल घेऊन, विद्युत विभागाने चुकीची वायरिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि जखमी महिलेला तातडीने आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.








