GRAMIN SEARCH BANNER

थंडी आली, शेकोटी हरवली! ग्रामीण भागातून शेकोटी संस्कृती होत आहे नामशेष

Gramin Varta
92 Views

सचिन यादव / संगमेश्वर

“आला थंडीचा महिना झटपट शेकोटी पेटवा…” या गाण्याच्या ओळी आता केवळ आठवणीत उरल्या आहेत. थंडीची चाहूल लागली आहे आणि सकाळ-संध्याकाळच्या गारव्यासह दाट धुक्याची चादर परिसर व्यापत आहे. पण, पूर्वीप्रमाणे गावागावात पेटलेल्या शेकोट्या आता विरळ्याच दिसतात.

एकेकाळी हिवाळ्याच्या दिवसांत आजीआजोबा, वडीलधारी मंडळी आणि बच्चेकंपनी शेकोटीभोवती बसून मायेची ऊब आणि गप्पागोष्टींचा आनंद घेत असत. त्या वेळी गाणी, ओव्या, अभंग, आणि जीवनानुभवांच्या कथा सांगत एक पिढी दुसऱ्या पिढीपर्यंत संस्कारांचा वारसा पोहोचवत असे. शेकोटी म्हणजे केवळ ऊब नव्हे, तर कौटुंबिक आणि सामाजिक संवादाचं केंद्रस्थान होतं.

मात्र, आज परिस्थिती वेगळी आहे. आधुनिकतेच्या लाटेत ग्रामीण भागातही जीवनशैलीत आमूलाग्र बदल झाला आहे. संयुक्त कुटुंबव्यवस्था कोसळली, घरातली एकत्रता हरवली आणि वृक्षतोडीमुळे इंधनासाठी लाकूडही कमी झालं. परिणामी, शेकोटी संस्कृती नामशेष होत चालली आहे.

यामुळे आता मुलांना शेकोटी पेटवणे हा ‘खेळ’ न वाटता ‘धोकादायक उपद्व्याप’ ठरतो आहे. अनुभवाअभावी अनेकदा जखमी होण्याचे छोटे-मोठे अपघात घडताना दिसतात.

दरम्यान, ज्येष्ठ नागरिकांच्या मते यावर्षी डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात चांगली थंडी पडणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेकोटीभोवती बसून ऊब घेण्याचा अनुभव ग्रामीण भागात परत येईल, अशी त्यांची अपेक्षा आहे.

थंडी वाढली आहे, पण मायेची ऊब देणारी शेकोटी मात्र काळाच्या ओघात विझत चालली आहे — हीच खरी खंत आहे.

Total Visitor Counter

3377181
Share This Article