GRAMIN SEARCH BANNER

थिबा राजाकालीन बुद्ध विहार बचाव संघर्ष समितीच्या आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल

Gramin Varta
268 Views

रत्नागिरी : तालुक्यात थिबा राजाकालीन बुद्ध विहार बचाव संघर्ष समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या विराट मोर्चाला तब्बल दहा दिवस उलटले असले तरी, त्या मोर्चात झालेल्या कथित आक्षेपार्ह व प्रक्षोभक वक्तव्यांप्रकरणी पोलिसांनी संघर्ष समितीच्या सहा पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवाईमुळे परिसरात पुन्हा तणाव निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे.

२७ ऑक्टोबर रोजी काढण्यात आलेल्या या मोर्चात बौद्ध समाजात उसळलेले रोष शासन आणि प्रशासनापर्यंत स्पष्टपणे पोहोचला होता. कम्युनिटी सेंटर रद्द करून आरक्षित जागेवरील उठवलेले आरक्षण पूर्ववत करण्याची आणि ती जागा समाजाच्या ताब्यात देण्याची मागणी करत हजारो नागरिक रस्त्यावर उतरले होते. मोर्चानंतर झालेल्या सभेत काही पदाधिकाऱ्यांनी सरकार, प्रशासन आणि संबंधित ट्रस्टविरोधात संताप व्यक्त करत केलेली भाषणे वादग्रस्त ठरली.

या पार्श्वभूमीवर प्रमोद प्रकाश पवार यांनी रत्नागिरी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार, सभेमध्ये काही पदाधिकाऱ्यांनी बौद्धजन पंचायत समिती रत्नागिरी आणि थिबा राजाकालीन बुद्धविहार विकास चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष तसेच कळझोंडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रकाश रामचंद्र पवार यांच्याविषयी मानहानीकारक, असभ्य आणि समाजात तेढ निर्माण करणारी भाषा वापरली. तसेच काही व्यक्तींनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्टही केल्याने समाजात संभ्रम पसरल्याचा आरोप करण्यात आला आहे. सभेचे अधिकृत चित्रीकरण शासनाकडे उपलब्ध असल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

मोर्चा परवानगीतील अटींचे उल्लंघन झाल्याचे नमूद करत शहर पोलिसांनी संघर्ष समितीचे अध्यक्ष एल. व्ही. पवार, कार्याध्यक्ष अनंत सावंत, अनिल जाधव, किशोर पवार, अमोल जाधव आणि राजेश सावंत या सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. शहर पोलिस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 424/2025 नुसार, हा गुन्हा भारतीय न्याय संहिता कलम 356(2), 352, 3(5) तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3)/135 अन्वये दाखल करण्यात आला आहे.

२७ ऑक्टोबर २०२5 रोजी दुपारी १२ ते २ वाजण्याच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ही घटना घडल्याची नोंद असून, ८ नोव्हेंबर रोजी रात्री ९.२३ वाजता गुन्हा नोंदविण्यात आला. या कारवाईमुळे पुन्हा वातावरण तापण्याची चिन्हे दिसत असून पोलिस सध्या तपास सुरू ठेवत आहेत.

Total Visitor Counter

3366975
Share This Article