GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीत महायुतीला तडा! नगराध्यक्षपदासाठी अजित पवार गटाचा स्वतंत्र उमेदवार

Gramin Varta
234 Views

रत्नागिरी: रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला असून, महायुतीतील एक घटक पक्ष असलेल्या अजित पवार गटाने नगराध्यक्षपदासह काही नगरसेवकपदांसाठी स्वतंत्र अर्ज भरल्याने युतीत उघडपणे बेबनाव निर्माण झाला आहे. अजित पवार गटाने घेतलेल्या या भूमिकेमुळे महायुती फुटल्याचे स्पष्ट झाले आहे.

या नाट्यमय घडामोडीत, अजित पवार गटाकडून सोमवारी बशीर मुर्तुझा यांच्या पत्नी वाहिदा मुर्तुझा यांनी नगराध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे, वाहिदा मुर्तुझा यांना रिंगणात उतरवण्यापूर्वी त्यांचे पती आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश चिटणीस असलेले बशीर मुर्तुझा यांनी ऐनवेळी पक्षांतर करत अजित पवार गटात प्रवेश केला.

अजित पवार गटाच्या या स्वतंत्र उमेदवारीने स्थानिक राजकारणात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. महायुती तोडण्याचा हा निर्णय अजित पवार गटाच्या प्रदेश स्तरावरून आला की रत्नागिरीतील स्थानिक नेत्यांनी ही भूमिका घेतली, याबाबत चर्चा सुरू आहेत.
दुसरीकडे, भारतीय जनता पक्षातील तीन इच्छुकांना पालकमंत्री महोदयांनी शिंदे गटातून उमेदवारी दिली होती. मात्र, महायुतीतून फुटून स्वतंत्र निवडणूक लढवणाऱ्या अजित पवार गटाला पालकमंत्र्यांनी थांबवले नाही, यावरून अनेक राजकीय जाणकार भुवया उंचावत आहेत. ही पालकमंत्र्यांची राजकीय खेळी आहे की काय, अशा चर्चाही रंगू लागल्या आहेत.

अजित पवार गटाने महायुतीपासून फारकत घेऊन स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या एकूण राजकारणावर याचे काय परिणाम होतील, याबद्दल राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना ऊत आला आहे. या बंडखोरीमुळे महायुतीच्या अधिकृत उमेदवारांचे निवडणुकीतील आव्हान अधिक खडतर झाले आहे.

Total Visitor Counter

3376313
Share This Article