GRAMIN SEARCH BANNER

राजापूर: सागरी महामार्गावर चिरेखन फाटा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन गाईंचा मृत्यू

जैतापूर/ राजन लाड: संपूर्ण राजापूर तालुक्यात मोकाट गुरांचा प्रश्न गंभीर बनलेला असताना, प्रशासनाची निष्क्रियता आणि लोकप्रतिनिधींची बेफिकीरी पुन्हा एकदा चिंतेचा विषय ठरली आहे. बुधवार, २६ नोव्हेंबर २०२५ च्या मध्यरात्री चिरेखन फाटा (ता. राजापूर) येथील सागरी महामार्गावर अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत दोन मोकाट गाईंचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने नागरिकांच्या जिवितासह मुक्या जनावरांचा जीवही धोक्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

अपघातानंतर प्रशासनाच्या संवेदनहीनतेचे धक्कादायक चित्र समोर आले. मृत गाई तब्बल आठ ते दहा तासांपर्यंत रस्त्याच्या कडेला तशाच पडून होत्या. या गंभीर घटनेची माहिती होऊनही दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ-दहा वाजेपर्यंत एकही स्थानिक लोकप्रतिनिधी किंवा ज्या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात हा भाग येतो, तेथील कुणीही प्रतिनिधी घटनास्थळी हजर न राहणे हा अधिकच धक्कादायक प्रकार होता. यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींचे बेफिकीर धोरण उघड झाले आहे.
दरम्यान, प्रांताधिकाऱ्यांनी नुकत्याच दिलेल्या आदेशानुसार प्रत्येक गावात मोकाट जनावरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी समिती गठीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, या घटनेतून स्पष्ट झाले की, प्रशासनाच्या आदेशांना स्थानिक स्तरावर स्पष्टपणे केराची टोपली दाखवण्यात आली आहे. प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. घटनेची माहिती मिळाल्यावर तातडीने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पोलीस पाटील तसेच काही स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृत गाईंची विल्हेवाट लावली. मात्र, दोन्ही गाईंच्या कानात कोणतीही ओळख टॅग नसल्याने त्या नेमक्या कोणाच्या मालकीच्या आहेत, हे स्पष्ट होऊ शकले नाही.

अशा बेवारस जनावरांना रस्त्यावर सोडणाऱ्या त्यांच्या मालकांवर कायदेशीर कारवाई व्हावी, तसेच या अपघातानंतर अज्ञात वाहनचालकासह संबंधित जबाबदार व्यक्तींवर गुन्हा दाखल व्हावा, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली होती. मात्र, तसे काहीही न घडल्याने स्थानिक लोकप्रतिनिधींची बेफिकीरी आणि प्रशासनाची हातबलता पुन्हा एकदा समोर आली आहे. मोकाट जनावरे आणि त्यांच्यामुळे होणारे जीवघेणे अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने आता तरी ठोस पाऊले उचलावीत, अशी तीव्र मागणी नागरिकांमध्ये उमटताना दिसत आहे.

Total Visitor Counter

3471960
Share This Article