GRAMIN SEARCH BANNER

कोकण रेल्वेतील चोरी प्रकरणांचा पर्दाफाश; रत्नागिरी लोहमार्ग पोलिसांची मोठी कारवाई, 5 लाखांचा मुद्देमाल जप्त

Gramin Varta
435 Views

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर गेल्या काही महिन्यांपासून प्रवाशांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या चोरीच्या घटनांना आता आळा बसण्याची चिन्हे दिसत आहेत. रात्री प्रवासी गाढ झोपेत असताना होणाऱ्या चोऱ्यांमुळे असुरक्षिततेचे वातावरण होते. मात्र, रत्नागिरी लोहमार्ग पोलिसांनी या प्रकरणांचा छडा लावत उल्लेखनीय यश मिळवले आहे. ऑगस्ट ते नोव्हेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत नोंद झालेल्या आठ चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करून एका आरोपीला अटक करण्यात आली असून, सुमारे पाच लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

रेल्वे मार्गावरील वाढत्या गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित करता यावे, यासाठी रत्नागिरी रेल्वे स्थानकात स्वतंत्र लोहमार्ग पोलीस ठाणे सुरू करण्यात आले आहे. या स्वतंत्र यंत्रणेच्या स्थापनेनंतर तपासाला मोठी गती मिळाली असून, नव्या पथकाने तातडीने चोरीच्या घटनांचा सखोल तपास हाती घेतला.

अल्पावधीतच लोहमार्ग पोलिसांनी प्रभावी कामगिरी करत आठही चोरीच्या तक्रारी उघडकीस आणल्या. तपासादरम्यान एका मुख्य आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडून चोरीस गेलेला सुमारे पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ताब्यात घेतलेल्या आरोपीची सध्या कसून चौकशी सुरू असून, या चोरीच्या कटात आणखी तीन साथीदार सहभागी असल्याची माहिती समोर आली आहे. हे तिघेही आरोपी सध्या फरार असून, त्यांचा शोध घेण्यासाठी लोहमार्ग पोलिसांची विशेष पथके रवाना झाली आहेत.

लोहमार्ग पोलिसांच्या या कारवाईमुळे कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून, रात्रीच्या वेळी होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आता कडक नजर ठेवली जाणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Total Visitor Counter

3369437
Share This Article