GRAMIN SEARCH BANNER

चिपळूण : फ्लॅट बुकिंग प्रकरणात ग्राहकाला दिलासा; पाच लाखांसह नुकसानभरपाई देण्याचे आदेश

Gramin Varta
201 Views

रत्नागिरी जिल्हा ग्राहक आयोगाच्या निर्णयाने ग्राहक समाधानी

चिपळूण : तालुक्यातील कोलेखाजन येथील रहिवासी वैभव भगवान चिपळूणकर यांना फ्लॅट बुकिंग प्रकरणात तब्बल तीन वर्षांच्या पाठपुराव्यानंतर अखेर न्याय मिळाला आहे. चिपळूण धामणवणे येथील बिल्डर संतोष दिनकर परांजपे (कल्पतरू डेव्हलपर्स, कपिला पार्क) यांनी परतफेड टाळल्याने चिपळूणकर यांनी रत्नागिरी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगात दाखल केलेल्या तक्रारीनुसार अखेर संपूर्ण रक्कम परत देत बिल्डरने नुकसानभरपाईची ५० हजार रुपयांची भरही दिली आहे.

चिपळूणकर यांनी ग्रामपंचायत हद्दीत सर्व्हे नं. ८२(०) आणि सर्व्हे नं. ७६/१अ/१ मधील पहिल्या मजल्यावरील ७८.८१ चौ.मी. बिल्टअप क्षेत्रफळाची सदनिका बुक केली होती. बुकिंगवेळी चेकद्वारे पाच लाख रुपये भरल्यानंतर ७ जानेवारी २०२२ रोजी साठेकरार करण्यात आला. मात्र २०२५ पर्यंतही कोणतेही बांधकाम सुरू न झाल्याने त्यांनी पुन्हा पुन्हा बिल्डरकडे विचारणा केली. बांधकाम न सुरू झाल्यास रक्कम परत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली; परंतु दोन वर्षे त्यांना कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही.

यानंतर जानेवारी २०२३ मध्ये बिल्डरने दिलेले दोन लाख आणि तीन लाखांचे चेक बाऊन्स झाल्याने चिपळूणकर यांनी तातडीने जिल्हा ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली. प्रकरणाची सुनावणी होताच बिल्डरला नोटीस बजावण्यात आली. आयोगासमोर बिल्डरने ३१ मे २०२५ पर्यंत संपूर्ण रक्कम परत करण्याचे लेखी आश्वासन दिले. मात्र ती मुदत उलटूनही परतफेड न झाल्याने पुढील तारखांवर बिल्डरने हप्त्यांमध्ये रक्कम देण्याची कबुली दिली.

११ मार्च २०२५ पासून सुरू झालेल्या परतफेडीत ग्राहकाला अखेर संपूर्ण मुद्दल पाच लाख रुपये परत मिळाले. याशिवाय आयोगाने सुचविलेल्या तडजोडीनुसार ५० हजार रुपयांची नुकसानभरपाई डी.डी. स्वरूपात देण्यात आली. याबाबतची लेखी पोचही घेण्यात आली.

२६ नोव्हेंबर २०२५ रोजी संयुक्त तडजोडीनुसार साठेकरार रद्द करण्यात आला. हे सर्व निर्णय आयोगाच्या न्यायालयात पुरसिस दाखल करून नोंदविण्यात आले.

तक्रार अर्ज क्रमांक १७ अंतर्गत दाखल प्रकरण दोन्ही पक्षांनी केलेल्या तडजोडीअन्वये आयोगाने निकाली काढले आहे.

ग्राहक आयोगामार्फत आज खऱ्या अर्थाने न्याय मिळाला

“मला आज खऱ्या अर्थाने न्याय मिळाला. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगामुळेच संपूर्ण रक्कम आणि नुकसानभरपाई मिळाली,” अशी भावना वैभव चिपळूणकर यांनी व्यक्त केली. या संपूर्ण प्रक्रियेत कायद्याचे प्रचारक–प्रसारक, महाराष्ट्र राज्याचे राज्य प्रमुख मार्गदर्शक आणि माहिती अधिकार जिल्हाध्यक्ष योगेश तानू पेढांबकर यांचे मोठे सहकार्य मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.

Total Visitor Counter

3376361
Share This Article