GRAMIN SEARCH BANNER

अंड्यांच्या दरात वाढ; ब्रॉयलर प्रति नग अंड ८ रुपये तर, गावठी प्रति नग अंड १५ रुपये

Gramin Varta
138 Views

पुणे – थंडीच्या दिवसांत अंड्यांना मोठी मागणी असते. वाढती मागणी, पोल्ट्री खाद्याचे वाढलेले दर आणि उत्पादन खर्चातील वाढीमुळे अनेक ठिकाणी अंड्यांचे दर वाढले आहेत. ब्रॉयलर अंड प्रतिनग ७ ते ८ रुपये तर, गावठी अंड १५ ते २० रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

घाऊक बाजारातही दर तेजीत असून मागणी आणि पुरवठ्यातील दरीमुळे ही भाववाढ झाली असल्याची माहिती किरकोळ विक्रेत्यांनी दिली.

स्वस्त आणि पौष्टिक अन्नपदार्थ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंड्यांच्या दरात गेल्या काही दिवसांपासून वाढ झाली असून, काही आठवड्यांपूर्वी किरकोळ बाजारात ७२ रुपये प्रतिडझन दराने मिळणारी ब्रॉयलर अंडी सध्या ९६ रुपयांना विकली जात आहेत. अंड्यांच्या दरात झालेल्या वाढीचा सर्वसामान्यांबरोबरच अनेक लहान-मोठ्या व्यावसायिकांनाही फटका बसला आहे.

हिवाळ्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण अधिक असलेली अंडी खाण्याकडे मांसाहारींचा कल असतो. परिणामी, अंड्यांच्या मागणीत वाढ होते आणि त्याच्या किमतीही वधारतात. दरवर्षी याकालावधीत अंड्याचे दर वाढलेले पाहायला मिळतात. अंड्यांच्या वाढत्या मागणीच्या तुलनेत आवक होत नसल्याने ही दरवाढ होते, असे काही विक्रेते सांगतात. तर, पोल्ट्री खाद्याचे वाढलेले दर आणि उत्पादन खर्चातील वाढ याचा फटका देखील अंड्यांच्या दरावर बसतो.

ब्रॉयलर अंड्यांसह गावठी अंड्यांचे दर देखील वाढलेले पाहायला मिळत आहेत. काही आठवड्यांपूर्वी गावठी अंड प्रति नग १२ रुपयाने विक्री केले जात होते. तर, १४४ रुपये प्रति डझन दराने मिळत होते. आता, गावठी अंड प्रति नग १५ रुपयाने तर, १८० रुपये प्रति डझन दराने मिळत आहेत, अशी माहिती अंडी विक्रेते सुरेश चंद्र यांनी दिली.

Total Visitor Counter

3198848
Share This Article