GRAMIN SEARCH BANNER

लाडक्या बहिणींसाठी सरकारचा सर्वात मोठा निर्णय; ई-केवायसीसाठी मुदतवाढ

Gramin Varta
840 Views

मुंबई : महायुतीला विधानसभा निवडणुकीत पुन्हा सत्ता मिळवून देण्यात यशस्वी ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी दिवसेंदिवस वेगवगळ्या अटी शर्तीं घातल्या जात आहेत.

ही योजना राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडून चालवली जात आहे. याच संदर्भात महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत शासन पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य देत असल्याचं म्हणत सर्व लाभार्थी महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असं आवाहन केले होते. तसेच 18 नोव्हेंबरपूर्वी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असेही त्यांनी म्हटले होते. मात्र आता ई-केवायसीसाठी मुदतवाढ दिल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे.

आदिती तटकरे यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करताना म्हटले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ संपूर्ण राज्यात अतिशय यशस्वीरित्या राबवली जात आहे. याबाबत दिनांक 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी सर्व लाभार्थ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया करावी, अशा सूचना यापूर्वी देण्यात आल्या होत्या. परंतु, गेल्या काही दिवसात आपल्या राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणींमुळे, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील अनेक पात्र भगिनींना ई-केवायसी प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आलेली नाही, याची मला पूर्ण कल्पना आहे. या अडचणींची गांभीर्याने नोंद घेत राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

आदिती तटकरे म्हणाल्या की, लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे. त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई-केवायसी करावे आणि त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करावी. या निर्णयामुळे योजनेच्या लाभाची सातत्यता आणि अखंडितता कायम राहणार आहे. ज्या भगिनींनी अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांना विनंती आहे की, त्यांनी या विस्तारित मुदतीचा लाभ घेत ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, असे आवाहन आदिती तटकरे यांनी केले आहे.

Total Visitor Counter

3229099
Share This Article