GRAMIN SEARCH BANNER

लांजातील तरुणांचा प्रेरणादायी उपक्रम ; नववर्षाच्या पूर्वसंध्येला चिकन-मटण, मद्यपान, गोंगाट टाळत पांडुरंगाच्या नामस्मरणात तल्लीन

Gramin Varta
393 Views

अखिल लांजा तालुका प्रासादिक भजन मंडळाचा आगळावेगळा आदर्श

लांजा : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जल्लोष, धांगडधिंगा आणि मद्य-मांसाहाराकडे वळणाऱ्या थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर अखिल लांजा तालुका प्रासादिक भजन मंडळाने एक वेगळाच आदर्श समाजासमोर ठेवला. ३१ डिसेंबर २०२५ रोजी चिकन-मटण, मद्यपान आणि गोंगाट टाळत पांडुरंगाच्या नामस्मरणात तल्लीन होण्याचा संकल्प या मंडळाने प्रत्यक्षात उतरवला आणि संपूर्ण वातावरण हरिनामाच्या नशेत न्हाऊन निघाले.
लांजा तालुका भजन मंडळाचे अध्यक्ष बुवा श्री. संजय जनार्दन सुर्वे (भडे) यांच्या घरी त्यांच्या वडिलांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त अत्यंत भावपूर्ण व दर्जेदार भजन गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या निमित्ताने तालुक्यातील अनेक नामवंत भजनी बुवा एकत्र आले आणि भक्तिरसाने ओथंबलेला एक वेगळाच आध्यात्मिक सोहळा अनुभवायला मिळाला.

या कार्यक्रमात बुवा श्री. बळीराम दळवी (शिपोशी), बुवा श्री. महेश बामणे (लांजा), बुवा श्री. जगन्नाथ पांचाळ (कुरचुंब), कु. ऋग्वेद लिंगायत (लांजा), बुवा श्री. दिलीप पांचाळ (इंदवटी), बुवा श्री. सुहास सुर्वे (लावगण), बुवा श्री. स्वप्निल पांचाळ (लांजा), बुवा श्री. सचिन लिंगायत (लांजा), श्री. बंड्या लिंगायत (लांजा) तसेच बुवा श्री. मनोहर लाखण (पुनसकोंड) यांनी एकापेक्षा एक सरस सादरीकरण करत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

भजनांना पखवाजाची अप्रतिम साथ लांजा तालुक्यातील सुप्रसिद्ध पखवाजवादक श्री. परेश मयेकर, श्री. मंदार जाधव, श्री. मंगेश पांचाळ आणि कु. शुभम सुर्वे यांनी दिली, तर डग्गा-तबल्याची दमदार साथ श्री. अरुण (दादा) डांगे यांनी दिली. सुमारे तीन तास पंधरा मिनिटे चाललेल्या या कार्यक्रमाने उपस्थित भक्तांना आध्यात्मिक आनंदाची अनुभूती दिली.

थर्टी फर्स्टला धांगडधिंगा न करता भक्तीचा मार्ग स्वीकारत लांजा तालुका भजन मंडळाने समाजासमोर एक सकारात्मक आणि प्रेरणादायी आदर्श उभा केला आहे. विशेषतः तरुण पिढीसाठी हा उपक्रम निश्चितच दिशादर्शक ठरणारा आहे. मंडळाने यापूर्वीही वेळोवेळी समाजोपयोगी उपक्रम राबवले असून या उपक्रमाबद्दल तालुक्यातून मोठ्या प्रमाणात कौतुक व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

कार्यक्रमाच्या शेवटी बुवा श्री. संजय जनार्दन सुर्वे यांनी सर्व भजनी बुवा व कलाकारांचा यथोचित सन्मान करून स्नेहभोजन देत मनापासून आभार मानले. भविष्यातही असेच समाजघडवणारे उपक्रम राबवून आदर्श निर्माण करण्याचा मानस मंडळाने व्यक्त केला असून सर्वत्र लांजा तालुका भजन मंडळाचे मनापासून कौतुक होत आहे.

Total Visitor Counter

3199307
Share This Article