GRAMIN SEARCH BANNER

राजापूर: रॅलिस पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

Gramin Varta
67 Views

वाटूळ (प्रतिनिधी): राजापूर तालुक्यातील वाटूळ येथील रॅलिस पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये (आदर्श विद्यामंदिर अँड ज्युनिअर कॉलेज) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला रॅलिस फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष अण्णा पवार, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचा प्रारंभ सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणांतून सावित्रीबाई फुले यांच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकला. स्त्री शिक्षण, सामाजिक समता आणि समाजपरिवर्तनासाठी त्यांनी भोगलेल्या यातना आणि दिलेले अतुलनीय योगदान याबद्दल विद्यार्थ्यांनी सविस्तर माहिती दिली. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून संस्थेमध्ये चालवल्या जाणाऱ्या महाराष्ट्र शासन मान्य डीएमएलटी (DMLT) तसेच जेईई (JEE) आणि नीट (NEET) यांसारख्या कोर्सेस संदर्भातही विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली.

उपस्थितांना मार्गदर्शन करताना अण्णा पवार यांनी स्त्री शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची दारे खुली करून समाजाला प्रगतीचा नवा मार्ग दाखवला आहे. आजच्या काळात प्रत्येक महिला शिक्षित होणे ही केवळ कुटुंबाचीच नव्हे, तर संपूर्ण देशाच्या विकासाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या सांगतेवेळी सर्व उपस्थितांनी सावित्रीबाईंच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा आणि समाजहितासाठी कार्य करण्याचा संकल्प केला. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक नवी प्रेरणा आणि सामाजिक जाणीव निर्माण झाल्याचे दिसून आले.

Total Visitor Counter

3376146
Share This Article