GRAMIN SEARCH BANNER

खेडमध्ये विठ्ठल मंदिराला भीषण आग; गाव हळहळले

Gramin Varta
287 Views

खेड : तालुक्यातील देवघर–निवीवाडी येथील ग्रामदैवत श्री विठ्ठल मंदिराला सोमवारी दुपारच्या सुमारास अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण करत मंदिराला वेढा घातला आणि भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असलेले हे पवित्र स्थान आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. या दुर्घटनेत मंदिरातील आतील रचना तसेच पूजेचे साहित्य जळून खाक झाले असून अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

आग लागल्याचे लक्षात येताच निवीवाडीतील ग्रामस्थ धावून आले. साई जंगम, अथर्व मोरे, समृद्धी निकम यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी जीव धोक्यात घालून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र आगीचा वेग प्रचंड असल्याने मंदिरातील साहित्य व वस्तू वाचवता आल्या नाहीत. डोळ्यादेखत विठ्ठल मंदिर जळताना पाहून ग्रामस्थांच्या डोळ्यांत अश्रू तर मनात तीव्र वेदना दाटून आल्या.

हे मंदिर केवळ बांधकाम नव्हे, तर गावकऱ्यांच्या श्रद्धेचा, आस्थेचा आणि पिढ्यानपिढ्यांच्या आठवणींचा आधार होते. सण, उत्सव, वारकरी परंपरा आणि गावातील प्रत्येक सुख-दुःखाच्या क्षणी या मंदिराशी नाळ जोडलेली आहे. त्यामुळे या आगीत मंदिराचे झालेले नुकसान हे आर्थिकपेक्षा भावनिकदृष्ट्या अधिक मोठे असल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

या आगीचे कारण शॉर्टसर्किट असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन लवकरच प्रयत्न सुरू करण्यात येतील, अशी भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Total Visitor Counter

3199402
Share This Article