GRAMIN SEARCH BANNER

संगमेश्वर: जलजीवन मिशनमधील अपुऱ्या कामाविरोधात २६ जानेवारीला सरपंचांचे आमरण उपोषण

Gramin Varta
110 Views

संगमेश्वर (प्रतिनिधी): संगमेश्वर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत मौजे असुर्डे (असुर्डे, साखळकोंड, भिरकोंड) हद्दीतील जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेची कामे अपुरी व रखडलेली असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत ग्रामपंचायत असुर्डेचे सरपंच यांनी २६ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिनी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
या संदर्भात सरपंचांनी ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग, संगमेश्वर (देवरुख) येथील उपअभियंत्यांना लेखी निवेदन दिले आहे. यामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामास मक्तेदाराकडून तातडीने सुरुवात न झाल्यास उपोषण सुरू ठेवण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

तसेच संबंधित मक्तेदारावर योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. २६ जानेवारीपूर्वी कामास सुरुवात न झाल्यास उपोषण मागे घेतले जाणार नाही, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यानंतर काही अनुचित घटना किंवा जीवितहानी झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील, असा गंभीर इशाराही सरपंचांनी दिला आहे.

या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, पालकमंत्री, स्थानिक आमदार, पोलीस अधीक्षक, तहसीलदार, गटविकास अधिकारी, आरोग्य विभाग व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवण्यात आल्या आहेत.जलजीवन मिशनसारख्या महत्त्वाच्या योजनेतील दिरंगाईमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असून प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Total Visitor Counter

3366821
Share This Article