GRAMIN SEARCH BANNER

चिपळूणमध्ये चोरट्यांचा हैदोस; एकाच इमारतीतील दोन फ्लॅट फोडून लाखोंचे दागिने लंपास!

Gramin Varta
136 Views

चिपळूण: तालुक्यातील पेढे येथील वडकर कॉलनी परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत दोन फ्लॅट लक्ष्य केले असून, एका घरातून सुमारे २ लाख १७ हजार ७५० रुपये किमतीची सोन्याची बोरमाळ चोरून नेली आहे. या धाडसी चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली असून चिपळूण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेली माहिती अशी की, मूळचे सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील रहिवासी असलेले भास्कर उमाजी मंडले हे पेढे वडकर कॉलनीतील बी-१० क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये भाड्याने राहतात. २१ जानेवारीच्या रात्री ११ ते २२ जानेवारीच्या सकाळी ७ वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा कोणत्यातरी हत्याराने कापून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील कपाटाचे कुलूप तोडून त्यातील सोन्याची बोरमाळ लंपास केली.

केवळ मंडले यांच्याच घरी नव्हे, तर याच इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहणारे संजय पवार यांच्याही फ्लॅटचा कडी-कोयंडा कापून चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि तिथेही घरफोडी केली.

या प्रकरणी भास्कर मंडले यांनी २२ जानेवारी रोजी दुपारी चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०५ (क) आणि ३३१(४) अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक २७/२०२६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. एकाच रात्री एकाच इमारतीतील दोन फ्लॅट फोडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलीस या प्रकरणाचा तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास करत असून लवकरच चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या जातील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Total Visitor Counter

3215417
Share This Article