GRAMIN SEARCH BANNER

ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात रत्नागिरी पोलीस अधीक्षक कार्यालयाचा राज्यात पाचवा क्रमांक

Gramin Varta
49 Views

रत्नागिरी: महाराष्ट्र शासनाच्या १५० दिवसीय ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने ‘सर्वोत्तम पोलीस अधीक्षक कार्यालय’ या श्रेणीत उल्लेखनीय कामगिरी करत संपूर्ण राज्यात पाचवा क्रमांक पटकावला आहे. शासनाचे कामकाज अधिक पारदर्शक, कार्यक्षम आणि नागरिकाभिमुख व्हावे या उद्देशाने हा विशेष कार्यक्रम राबविण्यात आला होता. प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर, २६ जानेवारी २०२६ रोजी महाराष्ट्र शासनाद्वारे या मूल्यमापनाचे निकाल अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहेत. या यशामुळे रत्नागिरी पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर शिक्कामोर्तब झाले आहे. 

राज्यातील एकूण ३४ पोलीस अधीक्षक कार्यालयांचे मूल्यमापन ‘क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया’ (QCI) या संस्थेमार्फत करण्यात आले होते. या प्रक्रियेत प्रामुख्याने सात महत्त्वाच्या निकषांचा विचार करण्यात आला, ज्यामध्ये कार्यालयाची अधिकृत वेबसाईट, ‘आपले सरकार’ प्रणालीचा वापर, ई-ऑफीस प्रणाली, कार्यालयीन डॅशबोर्ड, व्हॉट्सऍप चॅटबॉटची सुविधा, तसेच आधुनिक तंत्रज्ञान जसे की एआय, ब्लॉकचेन आणि जीआयएस तंत्रज्ञानाचा शासकीय कामकाजातील वापर यांचा समावेश होता. या सर्व निकषांवर आधारित एकूण २०० गुणांच्या मूल्यमापनात रत्नागिरी पोलीस अधीक्षक कार्यालयाने १४४.२५ गुण मिळवून राज्यात पाचवे स्थान मिळवले. 

पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्हा पोलीस दलात या सर्व तांत्रिक सुधारणांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वसामान्य नागरिकांना जलद सेवा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला होता. या यशाबद्दल पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांनी या प्रक्रियेत योगदान देणाऱ्या सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदारांचे अभिनंदन केले आहे. भविष्यातही ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून नागरिकांना अधिक उत्कृष्ट सेवा देण्याचा संकल्प रत्नागिरी पोलीस दलाने व्यक्त केला आहे.

Total Visitor Counter

3369434
Share This Article