रत्नागिरी: लावणीसाठी पत्करला खडतर प्रवास; कुणाल पाटील यांचा ‘गोळप कट्टा’वर जीवनप्रवास उलगडला

saurabhsalvi26@gmail.com
3 Min Read

रत्नागिरी: शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द आणि लोककलेप्रती असलेली निष्ठा असेल, तर माणूस प्रवाहाविरुद्ध पोहूनही आपले ध्येय गाठू शकतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे कासारवेली येथील ‘लावणीसम्राट’ कुणाल पाटील. गोळप कट्टाच्या जानेवारी महिन्यातील ७६ व्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अविनाश काळे यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत कुणाल पाटील यांनी आपला अत्यंत भावूक आणि संघर्षाने भरलेला प्रवास श्रोत्यांसमोर मांडला.

लहानपणीची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची, आई-वडिलांचा झालेला घटस्फोट आणि अनेकदा उपाशी पोटी झोपावे लागलेले दिवस आठवताना कुणाल पाटील भावूक झाले. वयाच्या सहाव्या वर्षापासून नृत्याची आवड जोपासत असताना शाळेत ‘मुंगळा’ गाण्यावर पहिल्यांदा नऊवारी साडी नेसून त्यांनी नृत्य सादर केले. पुढे कॉलेजमध्ये असताना ‘बिन बायकांचा तमाशा’ पाहून स्त्री वेषातील पुरुष कलावंतांच्या कौशल्याने ते प्रभावित झाले. बारावीत असताना विठाबाई नारायणगावकर यांची ‘पोटासाठी नाचते मी’ ही लावणी सादर केली आणि तिथूनच त्यांच्या खऱ्या प्रवासाला सुरुवात झाली. मात्र, हा प्रवास सोपा नव्हता. पुरुष असूनही स्त्री वेषात नाचतो म्हणून समाजाकडून आणि नातेवाईकांकडून प्रचंड अपमान, मानहानी आणि चेष्टा सहन करावी लागली. या त्रासाला कंटाळून त्यांनी बारावीतच कॉलेज सोडले, पण लावणी सोडली नाही.

सुरुवातीच्या काळात रत्नागिरीतील स्पर्धांनंतर बस नसल्यामुळे रात्री दोन-दोन वाजता १०-१२ किलोमीटर पायी चालत घर गाठावे लागत असे. नृत्याचे शिक्षण घेण्यासाठी एका महिला कथक गुरूंनी ‘पुरुषांना शिकवत नाही’ म्हणून नाकारले, तेव्हा भविष्यात येणाऱ्या कोणत्याही गरजू मुलाला मोफत शिक्षण देण्याचा संकल्प त्यांनी केला आणि तो आजही ते पूर्ण करत आहेत. कुणाल पाटील यांनी २०१० मध्ये महाराष्ट्र शासनाचा ‘कलाश्री’ पुरस्कार पटकावला असून कोल्हापूर येथे ज्येष्ठ लावणी कलाकार सुरेखा पुणेकर यांच्या हस्ते त्यांना ‘लावणीसम्राट’ हा किताब मिळाला. आज त्यांच्याकडे ३०० हून अधिक सन्मानचिन्हे आहेत. विशेष म्हणजे, ज्या लावणीमुळे त्यांनी अपमान सोसला, त्याच कलेमुळे त्यांना कृषी विभागात नोकरी मिळाली आणि त्यांची जीवनसाथीही मिळाली.

सध्या कुणाल पाटील यांचा २५ जणांचा ‘रंग हा लावणीचा’ हा ग्रुप असून, याद्वारे ते लावणीची संस्कृती जोपासत आहेत. लावणी ही चेहऱ्याची अदाकारी असून त्यात अश्लीलतेला जागा नसावी, यावर त्यांनी विशेष भर दिला. आईला रिअॅलिटी शोच्या मंचावर नेण्याचे स्वप्न असल्याचे सांगतानाच, मुलांनी आपली आवड जोपासावी आणि पालकांनी त्यांना साथ द्यावी, असा संदेश त्यांनी दिला. कार्यक्रमाच्या शेवटी आनंदा बापट यांच्या हस्ते कुणाल पाटील यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद लाभला.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *