ग्लोबल कोकण महोत्सवात ‘महा निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन २०२६’ उत्साहात संपन्न

saurabhsalvi26@gmail.com
2 Min Read

पालघर: कोकण किनाऱ्यावरील निसर्गरम्य शिरगाव बीच येथे सुरू असलेल्या ग्लोबल कोकण महोत्सव 2026 दरम्यान आयोजित करण्यात आलेली ‘महा निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन २०२६’ ही कार्यशाळा उत्साहात पार पडली.

राज्याच्या औद्योगिक व निर्यात क्षमतेला नवे बळ देणाऱ्या या उपक्रमात प्रशासन, उद्योग क्षेत्र आणि नवउद्योजकांचा प्रभावी सहभाग दिसून आला.

विकास आयुक्त (उद्योग) दिपेंद्र सिंह कुशवाह यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यशाळेस अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, डहाणू उपविभागीय अधिकारी विशाल खत्री तसेच कोकण विभागाच्या सहसंचालक (उद्योग) विजू सिरसाठ यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

“नोकरी घेणारे नव्हे, नोकरी देणारे व्हा”

अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, आगामी काळात विविध पायाभूत प्रकल्पांमुळे पालघर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होणार असून किनारी, डोंगरी आणि नागरी भागात औद्योगिक संधी वाढणार आहेत. युवकांनी या संधींचा लाभ घेत उद्योजकतेकडे वळावे आणि “नोकरी देणारे” बनावे, असे आवाहन त्यांनी केले.उपविभागीय अधिकारी विशाल खत्री यांनी प्रशासन उद्योजकांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे स्पष्ट करत स्थानिक प्रशासनाशी थेट संवाद साधण्याचे आवाहन केले. विशेषतः आदिवासी भागातील सुशिक्षित युवक-युवतींनी उद्योग क्षेत्रात पुढे यावे, असे त्यांनी सांगितले.

पालघरची निर्यात ३०,१३८ कोटींवर

सहसंचालक (उद्योग) श्रीमती विजू सिरसाठ यांनी प्रास्ताविकात पालघर जिल्ह्याने मागील वर्षी तब्बल रु. ३०,१३८ कोटींची निर्यात साध्य केल्याची माहिती दिली. ‘एक जिल्हा एक उत्पादन’ (ODOP) अंतर्गत चिकू व सागरी उत्पादनांना विविध योजनांद्वारे प्रोत्साहन दिले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. नवउद्योजकांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमासारख्या योजनांचा लाभ घेऊन स्वतःचा उद्योग सुरू करावा, असे आवाहन त्यांनी केले.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *