कामावर जातो सांगून निघालेल्या तरुणाने घेतला जंगलात गळफास; दापोलीत धक्कादायक घटना

saurabhsalvi26@gmail.com
1 Min Read
suicide concept. noose with shadow on dark wall background

दापोली: तालुक्यातील तेरेवायंगणी बौद्धवाडी येथील एक २९ वर्षीय तरुण घरातून कामावर जातो असे सांगून निघून गेल्यानंतर त्याचा मृतदेह गावातीलच जंगलमय भागात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. सुमित मधुकर मोहिते असे या मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुमित मोहिते हा २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ‘मी चंद्रनगर येथे कामाला जातो’ असे घरच्यांना सांगून बाहेर पडला होता. मात्र, तो रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने आणि त्याचा कोणताही पत्ता न लागल्याने कुटुंबीयांनी त्याची आजूबाजूच्या परिसरात आणि नातेवाईकांकडे शोधाशोध सुरू केली होती. त्याचा शोध घेत असतानाच २ मार्च रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास मौजे तेरेवायंगणी येथील ‘पाखर’ नावाच्या जंगलमय भागात त्याचा शोध लागला. जंगलातील एका जंगली झाडाला सुमितने नायलाॅनच्या दोरीने गळफास लावून घेतल्याचे दिसून आले.

या घटनेची माहिती मिळताच दापोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलिसांनी याप्रकरणी बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे. तरुण वयातील मुलाने अशा प्रकारे टोकाचे पाऊल उचलल्याने तेरेवायंगणी बौद्धवाडी गावावर शोककळा पसरली आहे. दापोली पोलीस ठाण्यात या प्रकरणाची अधिकृत नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस अंमलदार करत आहेत.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *