GRAMIN SEARCH BANNER

चिपळूण: वालोपे परिसरात ‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत मोठी कारवाई; १० किलो गांजासह तिघांना अटक

रत्नागिरी:रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन फिनिक्स’ या विशेष मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अमली पदार्थांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. चिपळूण येथील वालोपे परिसरातील रेल्वे स्टेशन फाट्याजवळ मुंबई-गोवा महामार्गावरील सबवे येथे सापळा रचून पोलिसांनी १० किलो १३८ ग्रॅम गांजा जप्त केला असून, या प्रकरणी खेड तालुक्यातील सुकीवली येथील तीन इसमांना ताब्यात घेतले आहे.रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी दिलेल्या विशेष सूचनांनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक ३ मार्च रोजी चिपळूण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर होते.

यावेळी वालोपे येथे एका रिक्षा चालक आणि मोटरसायकल स्वाराच्या हालचाली पोलिसांना संशयास्पद वाटल्या. पोलिसांनी पंचांसमक्ष त्यांची चौकशी केली असता, आकाश विजय जाधव (वय ३०), शिवकुमार भास्कर ठाकरे (वय ४८) आणि शंकर विनोद पारदे (वय ३१, सर्व रा. सुकीवली, ता. खेड) अशी त्यांची नावे निष्पन्न झाली.संशयितांची अधिक तपासणी केली असता त्यांच्याकडे १० किलो १३८ ग्रॅम वजनाचा, सुमारे २ लाख ५३ हजार ४५० रुपये किमतीचा गांजा आढळून आला.

या कारवाईत गांजासह दोन वाहने आणि इतर साहित्य असा एकूण ४ लाख ६८ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हे तिन्ही आरोपी गांजाची बेकायदेशीर विक्री करण्याच्या उद्देशाने तो बाळगून असताना रंगेहात पकडले गेले. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास चिपळूण पोलीस करत आहेत.ही यशस्वी कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रशांत बोरकर, अंमलदार सुभाष भागणे, शांताराम झोरे, दीपराज पाटील आणि प्रवीण होवाळ यांच्या पथकाने केली आहे.

Total Visitor Counter

3486541
Share This Article