GRAMIN SEARCH BANNER

चिपळूणमध्ये २३ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

suicide concept. noose with shadow on dark wall background

चिपळूण: तालुक्यातील मुंढे-सावंतवाडी येथे एका २३ वर्षीय तरुणाने राहत्या घरी छताच्या पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून ऐन उमेदीच्या काळातील तरुणाने अशा प्रकारे जीवन संपवल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दीपेश सुदेश सावंत (वय २३, रा. मुंढे-सावंतवाडी, ता. चिपळूण) असे मृत तरुणाचे नाव आहे. रविवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास ही घटना घडली. दीपेशने आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये कोणाच्याही नकळत छताच्या पंख्याला कापडाच्या सहाय्याने गळफास लावून घेतला. घरामध्ये ही बाब निदर्शनास आल्यानंतर तत्काळ याची माहिती पोलिसांना देण्यात आली. मात्र, तोपर्यंत दीपेशचा मृत्यू झाला होता. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

या घटनेची माहिती मिळताच अलोरे-शिरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. रविवारी सायंकाळी ६ वाजून ९ मिनिटांनी या प्रकरणाची पोलीस दप्तरी नोंद करण्यात आली आहे. अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Total Visitor Counter

3485558
Share This Article