रत्नागिरी : पाली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे रविवारी उद्घाटन

saurabhsalvi26@gmail.com
2 Min Read

रत्नागिरी : पाली येथे उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे उद्घाटन येत्या रविवारी, दि. १५ रोजी होणार आहे. रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते हा सोहळा पार पडणार असून राजापूरचे आमदार किरण ऊर्फ भैया सामंत तसेच सुप्रसिद्ध उद्योजक रवींद्र ऊर्फ अण्णा सामंत यावेळी उपस्थित राहणार आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर कोकणातील पहिल्या धम्मदीक्षेचा ऐतिहासिक सोहळा सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली १ मे १९५७ रोजी पाली येथे पार पडला होता. त्यामुळे पाली दीक्षाभूमीला बौद्ध समाजात विशेष ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. याच पवित्र स्थळी उभारण्यात आलेल्या डॉ. आंबेडकर स्मारकाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९.३० वाजता नाणीज येथून बुद्धमूर्ती आगमनाने होणार असून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, पाली येथून बौद्धवाडी समाजमंदिर मार्गे बाजारपेठेतून दीक्षाभूमीपर्यंत भव्य धम्म मिरवणूक काढण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता धम्मध्वजारोहण होईल. त्यानंतर सकाळी ११.३० ते दुपारी १.३० या वेळेत बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना, पूजापाठ व धम्मदेशना कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

दुपारी १.३० ते ३.३० या वेळेत भन्ते डॉ. मैत्रेयघोष आयुपाल यांच्या उपस्थितीत स्नेहभोजनाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर स्मारकाचे उद्घाटन होईल. हा कार्यक्रम पाली पंचक्रोशी बौद्ध समाज मंडळ, महिला मंडळ पाली पंचक्रोशी व तरुण मंडळ पाली पंचक्रोशी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *