लांजा नगरपंचायतीचा ३० कोटींचा अर्थसंकल्प मंजूर; विकासकामांना गती, करवाढ नाही

saurabhsalvi26@gmail.com
2 Min Read

लांजा : नगरपंचायतीचा आर्थिक वर्ष २०२६–२७ साठीचा तब्बल ३० कोटी ९ लाख १६ हजार ८३८ रुपयांचा अर्थसंकल्प नगराध्यक्षा सावली कुरूप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत मंजूर करण्यात आला. शहराच्या विकासाला चालना देणारा तसेच मूलभूत सुविधांवर भर देणारा हा अर्थसंकल्प असल्याचे यावेळी सांगण्यात आले.अर्थसंकल्प मंजुरीच्या बैठकीस नगराध्यक्षा सावली कुरूप यांच्यासह उपनगराध्यक्ष मिलिंद लांजेकर, मुख्याधिकारी अभिजीत कुंभार, सर्व नगरसेवक तसेच नगरपंचायतीचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजनांवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.मंजूर अर्थसंकल्पात महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे दलित वस्ती सुधार योजना, दलितेत्तर वस्ती विकास योजना यांसह शहरातील रस्ते दुरुस्ती व बांधकाम, पाणीपुरवठा व्यवस्था बळकट करणे, गटारे बांधकाम तसेच स्वच्छता व्यवस्थेच्या सुधारणा कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर नगरपंचायतीने विशेष भर दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

या अर्थसंकल्पामध्ये नागरिकांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेऊन विकासकामांना प्राधान्य देण्यात आले असून महसुली आणि भांडवली खर्चाचे सुयोग्य नियोजन करण्यात आले आहे. येत्या आर्थिक वर्षात नागरिकांना अधिक सक्षम मूलभूत सेवा देत शहराच्या विकासाला गती देण्याचा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.विशेष म्हणजे या अर्थसंकल्पात नागरिकांवर कोणतीही करवाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे लांजावासीयांना दिलासा मिळाला असून विकासकामांना चालना देतानाच नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडू नये याचीही काळजी नगरपंचायतीने घेतल्याचे दिसून येत आहे. परिणामी, या अर्थसंकल्पामुळे लांजा शहरातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम होऊन विविध विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *