GRAMIN SEARCH BANNER

केटरिंग व्यवसायावर गॅस तुटवडाचा परिणाम; लग्नसराईत संकटात

Gramin Varta
27 Views

मुंबई: सध्या लग्नसराई सुरू आहे. लग्नसराईत मंगल कार्यालये, लॉन्स हाऊसफुल्ल आहेत, तर केटरिंग व्यावसायिकांकडेही साखरपुडा, हळदी समारंभ, मेंदी समारंभ, लग्सोहळ्याची भोजनव्यवस्थेची कामे आहेत.

पण, व्यावसायिक गॅसपुरवठ्यावर झालेल्या परिणामाचा फटका केटरिंग व्यवसायाला चांगला बसल्याचे दिसून येत आहे.

लग्नसोहळ्यातील जेवणासाठी व्यावसायिकांवर काटकसर करून गॅस वापरण्याची वेळ आली आहे. येत्या आठवडाभरात स्थिती सुधारली नाही, तर लग्नसोहळ्याची पंगत होऊ शकणार नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. कारण, आखातात भडकलेल्या युद्धामुळे व्यावसायिक गॅसपुरवठ्यावर परिणाम झाल्याचा परिणाम केटरिंग व्यवसायालाही बसला आहे.

राज्यात सुमारे 23 हजारहून अधिक केटरिंग व्यावसायिक आहेत. पुण्यातील या व्यावसायिकांची संख्या 250 ते 300 च्या आसपास आहे. या सर्व व्यावसायिकांकडे फक्त आठवडाभर पुरेल एवढाच व्यावसायिक गॅससाठा शिल्लक असून, व्यावसायिक गॅसची सुविधा सुरळीत झाली नाही, तर आठवडाभरानंतर राज्यभरातील केटरिंग व्यवसाय बंद पडण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे त्याचा परिणाम व्यावसायिक गॅसपुरवठ्यावर झाला आहे. पुण्यासह राज्यभरात ठिकठिकाणी व्यावसायिक गॅसपुरवठा बंद करण्यात आल्याने त्याचा फटका फक्त हॉटेल व्यावसायिकांनाच नव्हे, तर केटरिंग व्यवसायावरही झाल्याचे चित्र आहे. 300 जणांसाठी जेवण बनविण्यासाठी केटरिंग व्यावसायिकांना एकावेळेला 19 किलोचा व्यावसायिक गॅस वापरावा लागतो. म्हणजेच, एका दिवशी दोन वेळचे जेवण असेल तर दोन गॅस वापरावे लागतात. त्यामुळे सध्यातरी व्यवसाय बंद करण्याशिवाय पर्याय नसल्याचे केटरिंग व्यावसायिकांनी सांगितले.

काय म्हणाले किशोर सरपोतदार?

महाराष्ट्र केटरिंग असोसिएशनचे अध्यक्ष किशोर सरपोतदार म्हणाले की, व्यावसायिक गॅसपुरवठा बंद झाल्याचा परिणाम फक्त हॉटेल, रेस्टॉरंट व्यवसायालाच नव्हे, तर केटरिंग व्यवसायालाही बसला आहे. केटरिंग व्यावसायिकांकडे जितका गॅसपुरवठा उपलब्ध आहे तोपर्यंतच ते व्यवसाय करणार आहेत. आठवडाभर पुरेल इतकाच पुरवठा त्यांच्याकडे आहे. परिस्थिती अशीच राहिली तर पुढील आठवड्यानंतर राज्यभरातील केटरिंग व्यवसाय बंद होणार आहेत. गॅसच्या तुटवड्यामुळे पुण्यातील केटरिंग व्यावसायिक लग्नसराईत काटकसर करून गॅसचा वापर करीत आहेत, तर केटरिंगसाठीचे आगाऊ बुकिंगही व्यावसायिकांनी बंद केले आहे.

Total Visitor Counter

3199603
Share This Article