GRAMIN SEARCH BANNER

‘भविष्यात सत्ता घेणारच’ – राज ठाकरे

Gramin Varta
149 Views

शिवतीर्थावर झाला मनसेचा गुढीपाडवा मेळावा

मुंबई:  मुंबईतील शिवतीर्थ मैदानावर दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा उत्साहात पार पडला.

राज्यभरातून मोठ्या संख्येने मनसैनिक या मेळाव्यासाठी उपस्थित राहिले होते. यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यातील विविध राजकीय, सामाजिक आणि आर्थिक विषयांवर भाष्य करत भविष्यात सत्ता मिळवण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दोन दशकांच्या प्रवासाचा उल्लेख करत राज ठाकरे म्हणाले की, “आज आपल्या पक्षाला 20 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि याच दिवशी गुढीपाडवा येणे हा शुभसंकेत आहे. आपण महाराष्ट्रासाठी उभे आहोत. राज्याचं गतवैभव परत मिळवण्यासाठी भविष्यात सत्ता आपल्या हाती घेणार म्हणजे घेणार, हा माझा आत्मविश्वास आहे. भाषणादरम्यान त्यांनी सध्याच्या राजकीय वातावरणावर टीका करत नागरिकांना जागरूक राहण्याचे आवाहन केले. “लोकांना करमणुकीत गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. सोशल मीडियापासून बाहेर या आणि सरकारला प्रश्न विचारा,” असे राज ठाकरेंनी सांगितले. शेतकरी प्रश्नावर भाष्य करत त्यांनी राज्यातील वाढत्या आत्महत्यांबाबत चिंता व्यक्त केली. “तीन वेळा कर्जमाफी होऊनही महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत आहेत. हा गंभीर विषय असूनही त्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे,” असे त्यांनी नमूद केले.

मुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पावर टीका करत त्यांनी म्हटलं की, “हा रस्ता सामान्य नागरिकांसाठी नसून इतरांना आणण्यासाठी तयार केला जात आहे.” तसेच राज्याची ओळख आणि मराठी भाषेच्या वापराबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली.भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी आंतरराष्ट्रीय घडामोडींवर भाष्य करत इराण-इस्रायल संघर्ष आणि त्याचा भारतावर होणाऱ्या परिणामांचा उल्लेख केला. एलपीजी गॅस टंचाईसंदर्भातही त्यांनी केंद्र सरकारवर अप्रत्यक्ष टीका केली.या मेळाव्यातील भाषणातून राज ठाकरे यांनी आगामी राजकीय वाटचालीचे संकेत देत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

Total Visitor Counter

3369509
Share This Article