GRAMIN SEARCH BANNER

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर रत्नागिरी जिल्ह्यात ६७३ वाहनांची विक्रमी विक्री

Gramin Varta
135 Views

आरटीओच्या तिजोरीत  २ कोटी ३१ लाख ६० हजार महसूल जमा

रत्नागिरी : हिंदू नववर्षाचे स्वागत आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर रत्नागिरीकरांनी वाहन खरेदीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, जिल्ह्यात एकाच दिवसात तब्बल ६७३ नवीन वाहने दाखल झाली आहेत. यामध्ये सर्वाधिक ४४३ दुचाकी आणि १३४ चारचाकी गाड्यांचा समावेश असल्याने ऑटोमोबाईल बाजारपेठेत मोठी आर्थिक उलाढाल पाहायला मिळाली. या प्रचंड वाहन नोंदणीमुळे उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या तिजोरीत एकाच दिवसात २ कोटी ३१ लाख ६० हजार ८० रुपये इतका मोठा महसूल जमा झाला असून आरटीओ कार्यालय एका अर्थाने ‘करोडपती’ झाले आहे.

भारतीय संस्कृतीत पाडवा हा अत्यंत शुभ मानला जात असल्याने या दिवशी मौल्यवान वस्तूंची खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल असतो, त्याचाच प्रत्यय यंदाही आला. गेल्या काही दिवसांपासून वाहन बाजारात असलेली मंदीची मरगळ या मुहूर्ताने झटकून टाकली असून ग्राहकांनी महिनाभरापासून केलेल्या बुकिंगमुळे शोरूम्समध्ये लगबग पाहायला मिळाली. यंदा तरुण वर्गाचा ओढा स्पोर्ट्स बाईक्स आणि स्कूटर्सकडे अधिक दिसला, तर मध्यमवर्गीय कुटुंबांनी आपल्या स्वप्नातील कार खरेदीचा आनंद साजरा केला. इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर काही ग्राहकांनी इलेक्ट्रिक वाहनांना (EV) पसंती दिल्याचेही चित्र यावेळी दिसले. या वाहन विक्रीमध्ये दुचाकी आणि कारसह ८ बांधकाम यंत्रे, ४७ प्रवासी रिक्षा, ३ मालवाहू टेम्पो, ६१ मालवाहतूक रिक्षा टेम्पो, २ बस आणि १ रुग्णवाहिकेचीही नोंद करण्यात आली आहे. गुढीपाडव्याच्या या मुहूर्तामुळे जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल झाली असून वाहन खरेदीचा हा उत्साह जिल्हाभरात कायम असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी स्पष्ट केले आहे.

Total Visitor Counter

3199256
Share This Article