GRAMIN SEARCH BANNER

चिपळूणमध्ये पत्रकार दीपक भागवत यांना बेदम मारहाण करणाऱ्या १० ते १५ बँक कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

Gramin Varta
186 Views

चिपळूण: चिपळूण येथील बहादूरशेखनाका परिसरात बुधवारी दुपारी एका आंदोलनाचे वार्तांकन करण्यासाठी गेलेले पत्रकार दीपक दिलीप भागवत यांना चिपळूण नागरी पतसंस्थेच्या १० ते १५ कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मारहाणीत जखमी झालेल्या पत्रकारावर उपजिल्हा रुग्णालय, कामथे येथे उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, खेड येथील सामाजिक कार्यकर्ते रूपेश सुरेश पवार हे चिपळूण नागरी पतसंस्थेच्या कारभाराविरोधात बहादूरशेखनाका येथील मुख्य कार्यालयासमोर उपोषणास बसले होते. या आंदोलनाचे वार्तांकन करण्यासाठी रत्नागिरी येथील ‘दूरदर्शन’, ‘पीटीआय’ आणि ‘आयएएनएस’चे जिल्हा प्रतिनिधी दीपक भागवत हे सकाळी १०:३० च्या सुमारास आपल्या कॅमेरामनसह घटनास्थळी पोहोचले होते. दुपारी १२ वाजेच्या सुमारास आंदोलनकर्ते आणि काही लोकांमध्ये बाचाबाची सुरू झाली. या घटनेचे चित्रीकरण करत असताना पतसंस्थेचे १० ते १५ कर्मचारी अचानक पत्रकार भागवत यांच्याकडे धावून आले. “तू कसला पत्रकार, तू कसले शूटिंग करतोस?” असे म्हणत त्यांनी भागवत यांना धक्काबुक्की करत खाली पाडले आणि लाथाबुक्क्यांनी छातीवर, पाठीवर व तोंडावर बेदम मारहाण केली. यावेळी बचावासाठी गेलेल्या पत्रकारांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली.

या गंभीर घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, कर्तव्यावर असलेल्या होमगार्ड्सनी मध्यस्थी करून मारहाण थांबवली. या झटापटीत पत्रकाराची महत्त्वाची कागदपत्रे आणि साहित्य असलेली बॅगही गहाळ झाली आहे. याप्रकरणी दीपक भागवत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चिपळूण पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या विविध कलमांसह ‘महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था (हिंसा आणि मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक) अधिनियम २०१७’ च्या कलम ४ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उप-अधीक्षक प्रकाश वसंत बेले करत आहेत. लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारावर भरदिवसा झालेल्या या हल्ल्याचा पत्रकार संघातून तीव्र निषेध व्यक्त होत आहे.

Total Visitor Counter

3210627
Share This Article