GRAMIN SEARCH BANNER

गुहागर : रात्री फेरफटका मारणाऱ्या वृद्धाला दगडाने ठेचून सोन्याची चैन लांबवली; तरुणावर गुन्हा

Gramin Varta
3 Views

गुहागर: तालुक्यातील अंजनवेल सडवेवाडी येथे एका ६५ वर्षीय निवृत्त वृद्धाला गाठून, त्यांच्यावर दगडाने जीवघेणा हल्ला करत दोन तोळे वजनाची सोन्याची चैन चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी गुहागर पोलिसांनी सडवेवाडी येथीलच प्रतीक डांगे नावाच्या २५ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सडवेवाडी येथील रहिवासी गणपत दाजी कदम (वय ६५) यांना रात्रीच्या जेवणानंतर घरासमोरील रस्त्याने बाबू कडव यांच्या हॉटेलपर्यंत फेरफटका मारण्याची सवय होती. २४ मार्च २०२६ रोजी रात्री १०.१५ च्या सुमारास फिर्यादी कदम हे चालत असताना, त्याच वाडीत राहणाऱ्या प्रतीक डांगे याने त्यांना गाठले आणि सोबत हॉटेलपर्यंत चालत येण्याचा आग्रह धरला. कदम यांनी उशीर झाल्याचे सांगून घरी जाण्याची इच्छा व्यक्त केली, तरीही आरोपीने आग्रह करून त्यांना सोबत नेले.

हॉटेलपासून परत येत असताना निर्जन ठिकाणी आरोपीने अचानक कदम यांचा गळा आवळून त्यांना खाली पाडले. त्यानंतर हातातील दगडाने त्यांच्या डोक्यात आणि डाव्या डोळ्यावर गंभीर वार करून त्यांना रक्तबंबाळ केले. एवढ्यावरच न थांबता, आरोपीने त्यांना टी-शर्टला धरून फरफटत नेत रस्त्याशेजारील झाडीत फेकून दिले आणि त्यांच्या गळ्यातील अंदाजे दोन तोळे वजनाची सोन्याची चैन हिसकावून अंधाराचा फायदा घेत पळ काढला.
या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या गणपत कदम यांनी याप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे.

पोलिसांनी २६ मार्च रोजी पहाटे २.५७ वाजता या घटनेची दखल घेत आरोपी प्रतीक डांगे विरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११९(१) अन्वये गुन्हा रजिस्टर नंबर १८/२०२६ नुसार नोंद केला आहे. गुहागर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

Total Visitor Counter

3214314
Share This Article