GRAMIN SEARCH BANNER

ब्रेकिंग: चिपळूण हादरले! रामपूर येथील आंबा बागेत १२ ते १३ वर्षीय मुलाचा आढळला जळालेला सांगाडा?

Gramin Varta
2.1k Views

चिपळूण : तालुक्यातील रामपूर परिसरातून एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. येथील एका हापूस आंब्याच्या बागेत मानवी हाडांचा जळालेला सांगाडा सापडल्याने संपूर्ण कोकण हादरले आहे. प्राथमिक अंदाजानुसार, हे अवशेष १२ ते १३ वर्षे वयोगटातील एका मुलाचे किंवा मुलीचे असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एका निळ्या रंगाच्या बॅगेत हा मृतदेह भरून तो जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून, आरोपीला शोधण्याचे मोठे आव्हान आता पोलीस प्रशासनासमोर उभे राहिले आहे. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह बॅगेत कोंबून तो पेटवून देण्यात आल्याचे दिसून येत आहे.

या घटनेचा उलगडा दीड महिन्यानंतर झाला आहे. बागेत काम करणाऱ्या एका मजुराला त्यावेळी हा मृतदेह दिसला होता, मात्र प्रचंड भीतीपोटी या मजुराने दीड महिना कोणालाही काहीही सांगितले नाही. अखेर त्याने बागेच्या मालकाला ही हकीकत सांगितली आणि या भीषण प्रकरणाचा उलगडा झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मेंगडे यांच्या नेतृत्वाखाली चिपळूण पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दीड महिना उलटल्याने मृतदेह पूर्णपणे जळून त्याचा केवळ सांगाडा उरला आहे. घटनास्थळी जळालेल्या निळ्या बॅगेचे अवशेष आणि दोन लोखंडी रॉड सापडले असून, या कृत्यात त्यांचा वापर झाल्याचा संशय आहे.

रत्नागिरी येथून फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले असून, हाडांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. ज्या क्रूरतेने हा मृतदेह बॅगेत भरून जाळला गेला आहे, त्यावरून हा पूर्वनियोजित खून असल्याचा संशय बळावला आहे. इतक्या लहान वयाच्या मुलाची हत्या कोणी आणि का केली, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. या घटनेमुळे देवखेरकी परिसरात भीतीचे सावट पसरले असून, गुन्हेगाराला लवकरात लवकर बेड्या ठोकण्याची मागणी होत आहे.

Total Visitor Counter

3379828
Share This Article