GRAMIN SEARCH BANNER

चिपळूण: वणव्यात होरपळून ७० वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू

चिपळूण: गाणे-खडपोली परिसरात जंगलात लागलेल्या वणव्यात होरपळून तारामती तुकाराम वाघे (वय ७०) यांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तारामती वाघे गेल्या चार-पाच दिवसांपासून बेपत्ता होत्या.त्या काही अंशी मानसिक आजाराने त्रस्त होत्या. त्यामुळे त्या अनेकदा घरातून निघून जात असत आणि काही वेळाने पुन्हा घरी परतत असत. यामुळे सुरुवातीला कुटुंबीयांनाही त्या परत येतील, अशी अपेक्षा होती.

दरम्यान, गाणे परिसरातील जंगलात चार दिवसांपूर्वी मोठा वणवा लागला होता. त्यानंतर एका व्यक्तीला जंगलातून लाकडाची फाटी आणण्यासाठी जंगलात गेल्यानंतर जळालेल्या अवस्थेतील एक मृतदेह आढळून आला. मृतदेहाजवळील साडीवरून तो मृतदेह तारामती वाघे यांचाच असल्याची ओळख पटली.

या घटनेची माहिती तत्काळ अलोरे-शिरगाव पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

प्राथमिक माहितीनुसार, जंगलात लागलेल्या वणव्याच्या तीव्रतेमुळे तारामती वाघे या होरपळून मृत्युमुखी पडल्या असाव्यात, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

या घटनेमुळे जंगल परिसरात लागणाऱ्या वणव्यांच्या वाढत्या घटनांबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत वणव्यांच्या घटना वाढत असल्याने जंगलालगत राहणाऱ्या नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासन आणि स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

Total Visitor Counter

3485608
Share This Article