GRAMIN SEARCH BANNER

लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधात कोकणी जनतेचा एल्गार; लोकप्रतिनिधींच्या अनुपस्थितीत हजारो ग्रामस्थांचा कारखान्यावर धडक मोर्चा

Gramin Varta
109 Views

लोटे: लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमधील वादग्रस्त ठरलेल्या लक्ष्मी ऑरगॅनिक कारखान्याविरोधात सोमवारी हजारो ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून प्रशासनाला धारेवर धरले. अत्यंत घातक मानल्या जाणाऱ्या ‘पी फास’ रसायनाचे उत्पादन मानवी जीवनासाठी आणि कोकणच्या निसर्गासाठी कर्दनकाळ ठरेल, असा संताप व्यक्त करत आंदोलकांनी हा कारखाना कायमचा बंद करण्याची मागणी केली. विशेष म्हणजे, या आंदोलनात कोणत्याही प्रस्थापित लोकप्रतिनिधीची मदत न घेता सर्वसामान्य कोकणी बांधव आणि विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येत आपली ताकद दाखवून दिली. ‘पी फास हटाव, कोकण बचाव’ आणि ‘नफा तुमच्या खिशात, आजार आमच्या दारात’ अशा गगनभेदी घोषणांनी यावेळी लोटे परिसर दणाणून सोडला होता.

या आंदोलनाची ठिणगी अशोक जाधव आणि राजेंद्र गोपीनाथ आंब्रे यांनी गेल्या ७६ दिवसांपासून कारखान्याच्या प्रवेशद्वारावर सुरू केलेल्या धरणे आंदोलनातून पडली होती. या दीर्घकालीन लढ्याला जिल्हाभरातून पाठिंबा मिळत गेला आणि त्याचे रूपांतर आज एका विराट मोर्चात झाले. कोकण नागरी संघर्ष समिती, लोटे पंचक्रोशी पर्यावरण संरक्षण समिती, मनसे, आम आदमी पार्टी आणि मच्छीमार संघटनांसह पंचक्रोशीतील हजारो नागरिक या जनआक्रोशात सहभागी झाले होते. कारखान्यापासून ५०० मीटर अंतरावर पोलिसांनी मोर्चा अडवला असता, तिथेच सभा घेऊन आंदोलकांनी प्रशासनाचा निषेध केला. ७६ दिवस शांततेत आंदोलन करूनही कारखाना व्यवस्थापन आणि सरकारने दखल न घेतल्याने अखेर जनतेला रस्त्यावर उतरावे लागल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

प्रशासनाच्या आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे निर्माण झालेला हा जनक्षोभ आता अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. ७६ दिवस उलटूनही स्थानिक प्रश्नाकडे डोळेझाक करणाऱ्या प्रशासनाला हा मोर्चा म्हणजे शेवटचा इशारा असल्याचे आंदोलकांचे प्रमुख उदय घाटे यांनी सांगितले. तर, हे आंदोलन केवळ एका व्यक्तीचे नसून संपूर्ण कोकणच्या अस्तित्वासाठी असल्याचे अशोक जाधव यांनी ठणकावून सांगितले. शासनाने या घातक उत्पादनावर तात्काळ बंदी घालून कारखाना बंद न केल्यास, यापुढील काळात संपूर्ण महाराष्ट्रात हे आंदोलन अधिक आक्रमकपणे पेटले जाईल, असा इशारा कोकणी जनतेने या मोर्चाच्या माध्यमातून दिला आहे.

Total Visitor Counter

3259783
Share This Article