तरवळ मायंगडेवाडीत भरदिवसा दोन घरांत घरफोडी; संशयित आरोपीला काही तासांतच अटक

saurabhsalvi26@gmail.com
2 Min Read

रत्नागिरी:तालुक्यातील तरवळ मायंगडेवाडी येथे भरदिवसा घरफोडीच्या दोन धाडसी घटना घडल्या असून, याप्रकरणी पोलिसांनी एका संशयित आरोपीला अवघ्या काही तासांत बेड्या ठोकल्या आहेत. आदित्य देवचंद कांबळे (वय २६, मूळ रा. पेठवडगाव, कोल्हापूर, सध्या रा. कारवांचीवाडी, रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ५ एप्रिल रोजी दुपारी २.३० ते ३.३० च्या सुमारास ही चोरीची घटना घडली. संशयित आरोपीने प्रथम विरेश प्रकाश मायंगडे यांच्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि कपाटातील ३३,००० रुपयांची रोकड लंपास केली. चोरी करून पळून जात असताना फिर्यादी विरेश आणि सर्वेश मायंगडे यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना धक्काबुक्की करून आरोपीने पळ काढला. याच सुमारास त्याने प्रज्योत रवींद्र मायंगडे यांच्या घराचे कुलूप तोडून तेथून ५,००० रुपये चोरले. दोन्ही घटना मिळून एकूण ३८,००० रुपयांची रोख रक्कम चोरीला गेली होती.

याप्रकरणी पीडित कुटुंबांनी तात्काळ पोलिसात धाव घेतली. विरेश मायंगडे आणि प्रज्योत मायंगडे यांच्या तक्रारीवरून रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम ३३१ आणि ३०५ (अ) अन्वये दोन स्वतंत्र गुन्हे (रजि. नं. ५४/२०२६ आणि ५५/२०२६) दाखल करण्यात आले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि ६ एप्रिल रोजी पहाटे २.४१ वाजता आरोपी आदित्य कांबळे याला अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीला गेलेल्या रकमेसह ५०० रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात असलेला मुद्देमाल जप्त केला आहे. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे तरवळ परिसरात भीतीचे वातावरण असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *