चिपळूण: आगवे येथे महामार्ग ओलांडताना दुचाकीची कारला धडक; दोन विद्यार्थी जखमी

saurabhsalvi26@gmail.com
2 Min Read

चिपळूण: मुंबई-गोवा महामार्गावर आगवे येथील हॉटेल ओशियानो पॅसिफिकसमोर रस्ता ओलांडताना दुचाकीने कारला जोरदार धडक दिली. ५ एप्रिल रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास घडलेल्या या अपघातात दुचाकीवरील दोन तरुण गंभीर जखमी झाले असून दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार गगनेश चंद्रकांत पटेकर यांनी फिर्याद दाखल केली असून दुचाकी चालकावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य नेमीनाथ सरडे (वय २०, सध्या रा. गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय हॉस्टेल, मांडकी पालवण, मूळ रा. सोलापूर) हा आपल्या ताब्यातील आर.एक्स १०० (क्र. एम.एच.१२.ए.३४९७) दुचाकीवरून मित्र साईराज सूर्यकांत सावंत (वय २०, मूळ रा. सातारा) याच्यासह प्रवास करत होता. आगवे येथे महामार्ग ओलांडत असताना दुभाजकावर थांबून दोन्ही बाजूच्या वाहनांची खात्री करणे आवश्यक होते. मात्र, आरोपीने हयगयीने आणि वेगाने आपली दुचाकी अचानक महामार्गावर घातली. याच वेळी गोवा बाजूकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अर्टिगा कारला (क्र. एम.एच.४६.सी.क्यू.०२००) दुचाकीने जोरदार धडक दिली.


या भीषण अपघातात दुचाकी चालक आदित्य सरडे आणि मागे बसलेला साईराज सावंत हे दोघेही जखमी झाले आहेत.महामार्गावर सुरक्षिततेचे नियम न पाळता वाहन चालवल्याने हा अपघात घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. याप्रकरणी सावर्डे पोलिसांनी आदित्य सरडे याच्यावर भारतीय दंड संहिता कलम १२५ (अ), १२५ (ब), २८१ आणि मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *