राजापूर : सोलगाव येथे कौटुंबिक वादातून बाप-लेकीला मारहाण; एकावर गुन्हा दाखल

saurabhsalvi26@gmail.com
2 Min Read

राजापूर: तालुक्यातील सोलगाव गांगो मंदिराजवळ जुन्या वादाचा राग मनात धरून एका तरुणाने पित्यासह त्याच्या मुलीला लाथाबुक्क्यांनी आणि बांबूच्या काठीने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी राजापूर पोलिसांनी रोहित वसंत गुरव (वय २७, रा. सोलगाव देवीगुरववाडी) याच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. याबाबत महेश नारायण डोंगरे (वय ५३) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ६ एप्रिल रोजी सकाळी ८.१५ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी महेश डोंगरे हे गांगो मंदिराजवळून आपल्या पत्नीशी फोनवर बोलत घरी जात होते. आदल्या दिवशी रात्री फिर्यादी यांचा पुतण्या गणेश हा दारू पिऊन घरी जात असताना आरोपी त्याला दगड मारत होता. त्यावेळी फिर्यादींनी विचारणा केली होती, याच गोष्टीचा राग मनात धरून आरोपी रोहित गुरव याने फिर्यादींना गाठून शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. आरोपीने फिर्यादींची मान पकडून त्यांना खाली पाडले आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी वडिलांना वाचवण्यासाठी गेलेल्या त्यांच्या मुलीलाही आरोपीने जोरात ढकलून दिले, ज्यामध्ये तिच्या हाताला व पायाला मुका मार लागला.

मारहाण एवढ्यावरच थांबली नाही, तर आरोपीने जवळच असलेली बांबूची काठी घेऊन फिर्यादींच्या पाठीवर आणि कमरेवर प्रहार करून त्यांना गंभीर दुखापत केली. तसेच ‘तुला मारून टाकीन व खड्ड्यात पुरून टाकीन’ अशी धमकीही त्याने दिली. या घटनेनंतर महेश डोंगरे यांनी राजापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहिता कलम ११८(१), ११५(२), ३५१(३) आणि ३५१(१) नुसार गुन्हा नोंदवला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *