दापोली-लाडघर मार्गावर रिक्षाचा अपघात; रिक्षा २० फूट खोल कोसळली, ३ जखमी

saurabhsalvi26@gmail.com
1 Min Read

दापोली : तालुक्यातील दापोली–लाडघर मार्गावर आज सकाळच्या सुमारास एक अपघात घडून रिक्षा सुमारे २० फूट खोल दरीत कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. ही घटना चंद्रनगर उतार परिसरात घडली असून, अपघातात तीन जखमी झाले आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, प्रभुआळी येथील चंद्रकांत खंडाळे यांच्या मालकीची रिक्षा लाडघरकडे जात होती. चंद्रनगर उतारावरून खाली उतरत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. उतार तीव्र असल्याने रिक्षा थेट रस्त्याच्या कडेला जाऊन सुमारे २० फूट दरीत कोसळली.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरीत उतरून त्यांनी रिक्षेत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे धाडसी प्रयत्न केले. स्थानिकांच्या तत्परतेमुळे जखमींना लवकर बाहेर काढण्यात यश आले.

या अपघातात शामल चंद्रकांत खंडाळे (वय ३८) आणि विकास बाळाराम बैकर (वय ३९) हे जखमी झाले आहेत. दोघांनाही तात्काळ उपचारासाठी दापोली उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अपघातानंतर काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा सुरू केला असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. प्राथमिक अंदाजानुसार वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडल्याचे मानले जात आहे.
या घटनेमुळे दापोली–लाडघर मार्गावरील धोकादायक उतारांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासनाने या मार्गावर सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *